रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांचा फोटो आणि नाव वापरून एका अनोळखी मोबाईल क्रमांकावरून व्हाट्सॲपद्वारे पैशांची मागणी केली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित संदेश आणि मोबाईल क्रमांक पूर्णपणे बनावट असल्याचे स्पष्ट करत प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद न देण्याचे आवाहन केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 7541080700 या अनोळखी मोबाईल क्रमांकावरून जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांचा प्रोफाईल फोटो लावून नागरिकांना व संबंधितांना व्हाट्सॲप मेसेज पाठवले जात आहेत. या संदेशांद्वारे पैशांची मागणी केली जात असून, वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांची प्रतिमा आणि ओळख वापरून सायबर भामट्यांकडून आर्थिक फसवणूक करण्याचा हा प्रयत्न असल्याचे स्पष्ट झाले आहे.
नागरिकांनी कोणती काळजी घ्यावी?
अशा प्रकारच्या सायबर फसवणुकीच्या प्रयत्नांना आळा बसावा आणि कोणाचेही आर्थिक नुकसान होऊ नये, यासाठी खालील बाबींचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे:
-
अनोळखी क्रमांकाकडे दुर्लक्ष करा: 7541080700 या मोबाईल क्रमांकावरून आलेल्या कोणत्याही व्हाट्सॲप संदेशाला उत्तर देऊ नका किंवा त्यावर कोणताही प्रतिसाद नोंदवू नका.
-
आर्थिक व्यवहार टाळा: जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने किंवा फोटोने आलेल्या अशा कोणत्याही मागणीवर विश्वास ठेवून पैसे पाठवू नका अथवा कोणताही आर्थिक व्यवहार करू नका.
-
अफवा व आमिषांपासून दूर राहा: रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व नागरिक, शासकीय अधिकारी आणि संबंधित घटकांनी या बनावट संदेशांबाबत सतर्क राहावे. अशा प्रकारच्या फसव्या संदेशांना किंवा आमिषांना बळी पडू नये.

