राज्यात अनेक ठिकाणी विविध प्रकारचे गुन्हे घडत असतात. महिलांच्या बाबतीत तर इतके गंभीर गुन्हे घडत असतात कि, शासन त्यासाठी विविध कडक कायदे सुद्धा अवलंबत आहे. शहरी भागामध्ये वाढत असलेले गुन्हे आता ग्रामीण भागाकडे सुद्धा वळले आहेत. अनेक ठिकाणी सकाळी फिरायला गेले असताना चेन मारणे, पैसे लुटणे, मारहाण, महिला एकट्या दुकट्या दिसल्या तर छेड काढणे ते बलात्कार पर्यत अनेक अशा प्रकारचे गुन्हे घडताना कानावर येत असतात.
बुधवार दिनांक २९ डिसेंबर रोजी खेड तालुक्यातील शिव बुद्रुक गावाच्या परिसरात दुपारी दोन वाजण्याच्या दरम्यान दोन अज्ञात व्यक्तींनी एका महिलेवर प्राणघातक हल्ला करून तिला गंभीर जखमी केले आहे. आणि तिच्या अंगावरील सोने आणि तिच्याजवळील पैसे घेऊन पोबारा केला.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, शिव बुद्रुक गावातील महाडिकवाडी मध्ये राहणारी यशोदा शांताराम महाडिक ही महिला बुधवारी दुपारी दोन च्या सुमारास गावातील बौद्धवाडी मार्गे मोहल्ला येथे निर्जन रस्त्यावरून जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात इसमानी तिच्यावर हल्ला चढवला. यावेळी तिला मारहाण करून तिच्या अंगावरील दागिने त्यामध्ये गळ्यातील सोन्याची चेन, मोबाइल व पर्स मधील रोख रक्कम हल्लेखोरांनी जबरदस्तीने हिसकावून घेतले. आणि हल्लेखोर तिला जखमी अवस्थेत तिथे रस्त्याच्या कडेला टाकून निघून गेले.
या घटनेची माहिती काही ग्रामस्थांना मिळाल्यानंतर त्यांनी पोलिसांना सांगितले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून जखमी महिलेला ग्रामस्थांच्या मदतीने कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. सायंकाळी उशिरापर्यंत या घटनेची नोंद करण्याचे काम सुरू होते. बेशुद्ध अवस्थेत सापडलेल्या या महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अज्ञात हल्लेखोरांचा शोध पोलीस घेत आहेत.