रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा येथे अल्पवयीन मुलानेच जन्म दात्याच्या डोक्यात हातोडा घालून त्यांचा खून केल्याची दुर्दैवी घटना पुनस बौद्धवाडी येथे घडली आहे. या प्रकरणी अल्पवयीन मुलावर लांजा पोलिस ठाण्यात मंगळवारी २२ मार्च रोजी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या खुनामागचे कारण ऐकून सारेचजण हादरले असून वडील सतत या मुलाला, ‘तू माझा मुलगा नाहीस’, असे वारंवार म्हणत असल्याच्या रागातून या अल्पवयीन मुलाने हे भयंकर कृत्य केल्याचे समोर आले आहे.
लांजा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुनस बौद्धवाडी येथील रहिवासी असलेले रवींद्र रावजी कांबळे वय ४० हे त्यांच्या पत्नीच्या चारित्र्यावर कायम संशय घेत असत आणि तिला काहीही वाईटसाईट बोलत असत. त्यासोबतच त्यांचा मुलगा अभिजीत कांबळे याला देखील तू माझा मुलगा नाहीस असे वारंवार बोलून त्याला हिणवत असत.
प्रत्येक वेळी ते भांडण करून त्याला अशाच प्रकारे बोलत असत. सोमवारी रात्री साडे बाराच्या दरम्यान पुन्हा रविंद्र कांबळे यांनी पत्नीशी भांडण उकरून काढले आणि सोबतच मुलगा अभिजीत याला देखील ‘तू माझा मुलगा नाहीस’ असे म्हणायला सुरुवात केली. एरव्ही दुर्लक्ष करणाऱ्या अभिजीतचा यावेळी मात्र स्वतःच्या रागावरचा ताबा सुटला आणि त्याने घरातील लोखंडी हातोडा आणून तो थेट वडील रवींद्र कांबळे यांच्या डोक्यावर मागील बाजूने जोरदार प्रहार केला. त्यात ते गंभीर जखमी झाले होते. रवींद्र कांबळे यांना रात्रीच जिल्हा शासकीय रुग्णालयात गंभीर अवस्थेत दाखल करण्यात आले होते. दरम्यान जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार घेत असलेले रविंद्र कांबळे यांचा मंगळवारी २२ मार्च रोजी मृत्यू झाला होता. त्यामुळे वडिलांच्या मृत्यू प्रकरणी अखेर लांजा पोलिसांनी मुलगा अभिजीत कांबळे याच्यावर ३०२ प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.