कोरोनामुळे राज्यातील शाळा यंदा उशिरा सुरू झाल्या, त्यामुळे बहुसंख्य शाळांतील वार्षिक परीक्षा संपल्यावरही एप्रिलपर्यंत शाळा सुरू राहणार आहेत. अभ्यासक्रम पूर्ण झाल्यामुळे एप्रिलपर्यंत शाळा सुरू ठेवून उजळणी घेण्याचे आदेश शाळांना देण्यात आल्याचे शालेय शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी सांगितले. काही शाळांतील अभ्यासक्रम पूर्ण होऊ शकलेले नाहीत, त्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाकडून एप्रिल अखेर पर्यंत शाळा सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. शिक्षण विभागातील अधिकाऱ्याना त्या आदेशाची नीट अंमलबजावणी करण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत.
एप्रिल अखेर पर्यंत विद्यार्थ्यांची शाळा सुद्धा सुरु ठेवण्याच्या निर्णयाने काही शाळांनी आपल्या परीक्षा आणि अभ्यासक्रम आटोक्यात आल्याचा दावा केला असला तरी, मागील वर्षभरामध्ये शाळांतील शिक्षण हे ऑनलाइन पद्धतीनेच सुरू असल्याने, त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शिकवण्यासाठी देण्यात आलेले तास अपूर्ण राहिले आहेत. त्यामुळे या शाळांना देखील एप्रिल अखेरपर्यंत अभ्यासक्रमाचा सराव घेण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत. शालेय शिक्षण विभागाने २४ मार्च रोजी एक शासन निर्णय जारी करून राज्यातील सर्व शाळा एप्रिल अखेरपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
परंतु, यंदा फेब्रुवारी पासूनच उन्हाळ्याच्या झळा मोठ्या प्रमाणात जाणवू लागल्याने, उकाडा आणि पाण्याची कमतरता मोठ्या प्रमाणात जाणवू लागल्याने त्याचा विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास होऊ शकतो. परीक्षा झाल्यानंतर विद्यार्थ्यांची सुद्धा मानसिकता पुन्हा शाळेमध्ये येण्याची नसते त्यामुळे या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांचे संपूर्ण लक्ष हे पडणाऱ्या उन्हाळी सुट्यांमध्ये लागलेले असते. त्याचप्रमाणे मागील दोन वर्षापासून कोरोना योद्ध म्हणून कार्यरत असल्याने शिक्षकाना सुद्धा गावी देखील जाता आले नाही. त्यामुळे या सर्वचा सारासार विचार करून निर्णय घेण्याची मागणी अध्यापक संघाने केली आहे.