पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे सध्या कोकण दौऱ्यावर असून, यावेळी त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड येथे जाऊन कुणकेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतले. मंदिरातील पुजाऱ्यांनी शंकराची विधिवत पूजा करवून घेऊन आदित्य ठाकरेंसाठी गाऱ्हाणे घातलं. मंदिर प्रशासनाच्या माध्यमातून कुणकेश्वर मंदिरात आलेल्या आदित्य ठाकरे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आदित्य ठाकरे यांनी कुणकेश्वर परिसराच्या विकासकामांसाठी पाच कोटी रुपयांचा निधी देखील मंजूर केला.
सिंधुदुर्गमध्ये पर्यटन व्यवसायाला मोठा वाव आहे. त्यावर लक्ष्य केंद्रीत करुन पर्यटन वाढवणं आवश्यक आहे आणि तसा विकास होताना दिसत आहे, अशी माहिती पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली. पर्यटन, पर्यावरण व वातावरणीय बदल, राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज मालवण जेट्टी बंधाऱ्याची देखील पाहणी केली. यावेळी पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, सिंधुरत्न समृद्ध योजनेचे अध्यक्ष आमदार दीपक केसरकर, आम.वैभव नाईक, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी मालवण नगरपरिषद क्षेत्रात उभारण्यात येणाऱ्या मत्स्यालय व जैवविविधता माहिती केंद्राचे सादरीकरण केले. यानंतर ते माध्यमांशी बोलताना म्हणाले, मत्स्यालयाचा प्रस्ताव असून अनेक हॉटेलांचे देखील प्रस्ताव येण्यास सुरुवात होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले हे केवळ किल्ले नसून ती मंदिरे आहेत. पर्यटन आणि त्यांचे संवर्धन अशा दोन्हींबाबत काम सुरु ठेवण्याबद्दल त्यांनी आदेश दिले आहेत.