मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम अत्यंत रटाळ गतीने आणि निकृष्ठ पध्दतीने केले जात असून ठेकेदाराची मनमानी देखील दिवसेंदिवस वाढत आहे. या निकृष्ठ दर्जाच्या कामामुळे महामार्गावर लहान मोठे अपघात होऊन अनेकांना जीव गमवावा लागत आहे. याकडे प्रशासन व यंत्रणा आणि लोक प्रतिनिधींनीही पूर्णतः दुर्लक्ष केले आहे. अनेकदा आंदोलने करून देखील काहीच फायदा झालेला नाही. त्यामुळे या विरोधात आता सर्वपक्षीय आंदोलन उभारले जाणार असल्याची माहिती भाजपाचे तालुका अध्यक्ष अभिजित गुरव यांनी दिली आहे.
राजापूर शहरात एसटी डेपोसमोर उड्डाणपुलाचा शेवट झाला आहे. या ठिकाणी भरधाव वेगात गाड्या येत आहेत. या ठिकाणी सर्कल करण्याचे प्रस्तावित आहे. मात्र या भागात जाणारे रस्ते, शहरात येणारी वाहतूक आणि एसटी डेपोकडे जाणारी वाहतूक लक्षात घेता या ठिकाणी या गंभीर अपघाताचा धोका निर्माण होणार आहे. त्यामुळे या ठिकाणी भुयारी मार्ग काढला जावा, अशी मागणीही गुरव यांनी केली आहे. याबाबत प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आल्याचे गुरव यांनी सांगितले.
राजापूर तालुक्यात सुरू असलेल्या महामार्ग चौपदरीकरणाच्या कामात ठेकेदाराची मनमानी सुरू आहे. अनेक ठिकाणी निकृष्ठ आणि घाईघाईने काम निपटण्यात आले आहे. तर कोंढेतड कुंभारवाडी जवळ गेले वर्षभर ठेकेदाराने मातीचा भराव टाकून ठेवला असून त्याचे संथगतीने सुरु असलेले काम अद्याप देखील पूर्ण झालेले नाही. त्यामुळे या ठिकाणी अगदी आठवड्यातून एक-दोन अपघात हे ठरलेलेच आहेत.
याबाबत ठेकेदाराला सांगूनही, प्रशासनाला माहिती निवेदने देऊनही कोणतीच कार्यवाही होत नसल्याने, आणि अनेक त्रुटी दाखवून देखील त्याची पूर्तता होत नाही. त्यामुळे आता या विरोधात सर्वपक्षीय जनआंदोलन उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असून सर्व पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून व स्थानिक जमीन मालक आणि ग्रामस्थांना सोबत घेऊन लवकरच जनआंदोलन छेडले जाईल असा इशारा गुरव यांनी दिला आहे.