मुंबई उच्च न्यायालयाने एसटी महामंडळाच्या विलीनीकरणावर भूमिका स्पष्ट करण्यासाठी राज्य सरकारला १५ दिवसांची मुदतवाढ दिली होती. यावर उच्च न्यायालयात सुनावणी होणार होती; परंतु संपकऱ्यांचे वकील अॅड. गुणरत्न सदावर्ते न्यायालयात गैरहजर राहिल्याने आज बुधवारी दि. ६ रोजी सुनावणी होणार आहे.
राज्याच्या विविध भागांतील हजारो एसटी कर्मचारी कडक उन्हामुळे अंगाची लाही लाही होत असताना सुद्धा असह्य उकाडयाची काळजी न करता आझाद मैदानामध्ये दाखल झाले आहेत. उच्च न्यायालयात विलीनीकरणाबाबत होणाऱ्या सुनावणीची उत्सुकता आणि हजर असलेल्या कर्मचाऱ्यांनाच विलीनीकरणाचा लाभ मिळेल अशा आशयाचा संदेश व्हायरल झाल्याने सोमवार पासूनच संपकरी कर्मचाऱ्यांनी आझाद मैदानाकडे धाव घेतली आहेत.
संपात सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांना पाच महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने पैसे उसनेवारी घेऊन घरखर्च चालवावा लागत आहे. परंतु, आपल्या विलीनीकरणाच्या मागणीसाठी ते आज पर्यंत अडून राहिले आहेत त्यामुळे कोणत्याही भूलथापांवर विश्वास न ठेवता विलीनीकरणाच्या मागणीवर एसटी कर्मचारी ठाम राहिले आहेत.
मुंबई विभागाबरोबरच, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अकोला, उस्मानाबाद, यवतमाळ, सांगली, वर्धा, औरंगाबाद, चंद्रपूर यासह एकूण ३२ विभागातून मोठय़ा प्रमाणात कर्मचारी सामानासहित आझाद मैदानात दाखल झाले आहेत. कडक उन्हात उभे राहून कर्मचारी विलीनीकरण आणि अन्य मागण्यांसाठी जोरजोरात नारे देत आहेत. यात महिला कर्मचाऱ्यांचीही संख्या लक्षणीय आहे, कुटुंब मुले यांची जबाबदारी बाजूला सारून नोकरीच्या सेवेबाबत अनेक महिला कर्मचारी संपामध्ये अद्याप पर्यंत ठाम आहेत.