सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी पोस्ट ऑफिसमध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. पोस्ट ऑफिसमध्ये ३८९२६ ग्रामीण डाक सेवक (GDS) पदांसाठी भरतीची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. भारतीय पोस्टच्या या भरतीमध्ये १० वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात.
या पोस्ट ऑफिसच्या भरतीमध्ये देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये भरती होणार आहे. पोस्ट ऑफिसमधील डाक सेवकच्या या पदासाठी अर्ज करण्यास इच्छुक आणि पात्र उमेदवार भारतीय पोस्ट ऑफिसच्या अधिकृत वेबसाइटवरून ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय ४० वर्षांपेक्षा जास्त नसावे.
भारतीय पोस्टच्या या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया कालपासून म्हणजे २ मे २०२२ पासून सुरू झाली असून ५ जून २०२२ पर्यंत अर्ज स्वीकारले जातील. इच्छुक उमेदवार indiapostgdsonline.gov.in वेबसाइट वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. या भरतीमध्ये पात्र उमेदवारांची निवड परीक्षा न घेता थेट १० वीच्या गुणपत्रिकेच्या आधारे केली जाईल. १० वी परीक्षेतील गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल.
भारतीय पोस्टाच्या या भरतीमध्ये डाक सेवक पदासह, शाखा पोस्टमास्तर (BPM), असिस्टंट पोस्टमास्तर (ABPM) या पदांसाठी पात्र उमेदवारांची निवड होणार आहे. शाखा पोस्टमास्तरला दरमहा १२००० रुपये, असिस्टंट पोस्टमास्तरसाठी दरमहा दहा हजार पगार दिला जाणार आहे.
सर्वात महत्वाचे : डाक सेवक पदाच्या भरतीसाठी उमेदवाराला सायकल चालवता येणे गरजेचे आहे. दुचाकी किंवा स्कूटर चालवणारे उमेदवार देखील अर्ज या पदासाठी ग्राह्य धरले जातील. त्यामुळे सर्व उमेदवारांनी व्यवस्थित नोटिफिकेशन पडताळून अर्ज करावे.