४ तारखेपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे उतरवण्याचा मुद्दा हाती घेतल्यानंतर सत्ताधाऱ्यांकडून त्यांच्यावर सडकून टीका केली जात आहे. त्यातच शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनीही राज ठाकरेंचा उल्लेख परिवर्तनवादी भोंगा म्हणून केला आहे. ते म्हणाले आधी झेंडा बदलला, गुजरात दौऱ्यानंतर मोदींचं कौतुक केलं, काही काळानंतर पुन्हा मोदींवर टीका करायला सुरुवात केली, पक्षाची धोरणे वेळोवेळी बदलली, असं म्हणत भास्कर जाधवांची राज ठाकरेंवर बोचरी टीका केलीय.
यापूर्वी राज ठाकरे योगींना गंजा म्हणजे टकला म्हणाले होते. आता अयोध्येत जाऊन त्यांच्या टकल्याला राज ठाकरे शाई लावणार आहेत का, अशी खोचक टीका देखील भास्कर जाधवांनी केली आहे. त्यांच्या भोंग्याकडे कोणी लक्ष देण्याची गरज नाही. सध्या त्यांच्यासमोर काही पर्याय उपलब्ध नसल्याने नाईलाजस्तव ते भाजपचा भोंगा वाजवत आहेत. काही काळ गेला कि ते पुन्हा भाजपवर टीका करायला सुरु करतील आणि शिवसेनेला मदत देखील करतील, असंही भास्कर जाधव म्हणाले.
पुढे सांगताना ते म्हणाले, ज्यावेळी त्यांनी मनसेची स्थापना केली तेव्हा त्यांच्या पक्षाचा झेंडा आणि त्यांचं भाषण पाहिलं तर कधी ते मोदींचं कौतुक करतात तर कधी मोदींवर टीका करतात. त्यांनी स्वत:च्या पक्षाचा झेंडा बदलला, रंग बदलला. त्यानंतर तेच म्हणाले की कोणीही मला हिंदुत्व किंवा हिंदुहृदयसम्राट म्हणायचं नाही तर मला मराठी सम्राट म्हणायचं. त्यानंतर पुन्हा त्यांनी हिंदुत्वाची भूमिका, मी हिंदुहृदयसम्राट अशा तोऱ्यात ते सध्या भाषणं करतायत. त्यामुळे राज ठाकरे म्हणजे परिवर्तनवादी भोंगा, असं मी म्हणतो”.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी केलेल्या बोचऱ्या टीकेला मनसेचे कोकणात विभागीय सरचिटणीस खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी जोरदार प्रत्युत्तर देत पलटवार केला आहे. भास्कर जाधव यांना आता मंत्रीपदाची आस लागली आहे. शिवसेना पक्ष नेतृत्वाची मर्जी राहावी त्यांना बरे वाटावे म्हणून ते बोलत असावेत, असा खेडेकर बोलले.