कोकणातील अनेक गडकिल्ल्यांवर पर्यटकांची गर्दी आहे. मोठ्या प्रमाणात पर्यटक आल्याने महसुलामध्ये देखील चांगली भर पडत आहे. परंतु, काही विघ्नसंतोषी पर्यटकांमुळे आज अनेक गड किल्ल्यांची नवे खराब होत आहेत.
कोल्हापूर येथील किल्ले सिंधुदुर्गवर पर्यटनासाठी आलेल्या तिघा पर्यटकांनी मद्यधुंद अवस्थेत किल्ल्यावरील राणीची वेळ येथील घट्ट तटबंदीचे दगड उखडून टाकल्याचा विचित्र प्रकार घडला आहे. हा प्रकार महाराष्ट्र पर्यटन महामंडळाच्या व्यवस्थापक सूरज भोसले व रोहन भोसले यांना समजताच त्यांनी पुरातत्व विभागाचे कर्मचारी यांना माहिती दिली. सायंकाळी मालवण पोलिसांना पाचारण करून मद्यधुंद अवस्थेत असलेल्या त्या तीन पर्यटकांना ताब्यात देण्यात आले आहे. याबाबत पुरातत्व विभागाकडून मालवण पोलीस ठाण्यात तक्रार देण्याची कार्यवाही रात्री सुरू होती.
कोल्हापूर गडहिंग्लज येथील तिघे पर्यटक एसटी मधून आज सकाळी मालवणात दाखल झाले. सिंधुदुर्ग किल्ल्यावर फिरण्यासाठी गेले असता त्यांनी गडावर जाऊन मद्य प्राशन केले आणि मालवण येथील किल्ले सिंधुदुर्ग तटबंदीचे दगड उखडून खाली टाकले, अशी माहिती समोर आली आहे. सायंकाळी सिंधुदुर्ग किल्ल्यावरील राणीची वेळ येथे ते गेले असता त्यांनी त्या तटबंदी वरील दगड उखडून टाकले. त्यातील एक दगड खाली कोसळताच त्याठिकाणी उपस्थित पर्यटकांनी घाबरून धावाधाव करण्यास सुरुवात केली.
हा प्रकार किल्ल्यावर आपल्या कुटुंबासमवेत फिरण्यासाठी आलेल्या महाराष्ट्र पर्यटन महामंडळाचे व्यवस्थापक सूरज भोसले व रोहन भोसले यांच्या निदर्शनास आला. त्यांनी या गंभीर घटनेची माहिती सिंधुदुर्ग किल्ल्यावरील पुरातत्व विभागाचे कर्मचारी राहुल जानीयार यांच्या कानावर घातली. जानीयार यांनी मालवण पोलिसांना फोन द्वारे याची माहिती दिली. सायंकाळी मालवण पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक शिवराज झांझुर्णे, पोलीस हवालदार सुहास पांचाळ यांनी या मद्यधुंद तिन्ही पर्यटकांना ताब्यात घेतले.