बहुचर्चित आणि सुरु करण्यात येण्याच्या प्रतिक्षेत असलेला भरणे नाका येथील उड्डाण पूल अखेर वाहतुकीस खुला झाला आहे. उड्डाण पुलावरील एका मार्गिकेचे काँक्रीटीकरण पूर्ण झाल्यावर या मार्गिकेवरून वाहतूक सुरू करण्यात आली असल्याने, वाहन चालकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. नक्कीच हि बातमी मुंबई-गोवा महामार्गावर प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी आनंदाची ठरणार आहे.
गेले तीन वर्षापासून या पुलाचे काम सुरू करण्यात आले होते. त्यामुळे भरणे परिसरात वाहतुकीचा प्रचंड खेळ खंडोळंबा होत होता. पावसाळ्यात तर या ठिकाणी वारंवार वाहतूकीची कोंडी होत असल्याने, ती कोंडी फुटण्यासाठी काही तासांचा अवधी देखील लागायचा. परंतु, आजपासून हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आल्याने येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लागला आहे.
मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणा दरम्यान महामार्गावरील जंक्शन असलेल्या भरणे नाका येथे पूर्वी भुयारी मार्ग प्रस्तावित केला होता. या ठिकाणी भुयारी मार्गासाठी खोल खड्डाही खणण्यात आला होता. मात्र, अचानक येथील भुयारी मार्ग रद्द करून उड्डाण पूल बांधण्याचा निर्णय घेतला गेला. भरणे नाका जंक्शनवर असणारी वाहतूक, तसेच या ठिकाणी ग्राहकांची आणि वाहनांची होणारी गर्दी लक्षात घेत उड्डाण पुलाचे काम वर्षभरात पूर्ण करणे गरजेचे होते. परंतु, त्याला साधारण तीन वर्षाचा कालावधी लागला.
अशात गेली तीन वर्षापासून कल्याण टोलवेज या ठेकेदार कंपनीकडून उड्डाण पुलाचे काम संथगतीने सुरू होते. त्यामुळे भरणे नाका येथील जंक्शनवर कायमच वाहतुकीची कोंडी झाल्याचे चित्र पहावयास मिळत होते. आणि पुलाचे काम सुरू झाल्यावर आंबवली विभागातील सुमारे १५ गावांकडे जाणारा रस्ताही बंद झाल्याने या भागात जाणाऱ्या प्रवाशांना मोठा वळसा घालून पुढील प्रवासास जावे लागत होते.