चिपळूण तालुक्यातील डेरवण क्रीडासंकुलातील अत्याधुनिक शूटिंग रेंजमध्ये सहा नव्या शस्त्रांची भर पडली आहे. जर्मन बनावटीच्या वॉल्थर कंपनीच्या ३ पीप साईट एअर रायफल तसेच प्रिसिहोल कंपनीच्या ३ एअर पिस्तूलचा त्यामध्ये समावेश आहे. या बंदुकांचा कोकणातील खेळाडूंना नेमबाजीसाठी उपयोग होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील डेरवण येथे २०१२ ला शूटिंग रेंजचे उद्घाटन करून डेरवण क्रीडा संकुलाचा प्रारंभ करण्यात आला होता. तेव्हापासून पूर्वा गायकवाड, ऐश्वर्या गायकवाड, रत्निका गुजर, समीक्षा नेरूळकर, वेद राजेशिर्के, अंकुश मोहिते, जय कोकाटे अशा सावर्डे परिसरातील राष्ट्रीय स्तरावर चमकलेल्या खेळाडूंनी डेरवण क्रीडासंकुलात सराव करून राष्ट्रीय स्तरावर यश मिळवले.
स्थानिकांना प्राधान्य देऊन त्यांना सर्वच अर्थाने पायावर उभे करण्याचा वसा विठ्ठलराव जोशी चौरेटीज ट्रस्टने घेतला आहे. शूटिंग या खेळाचे प्रशिक्षक असलेले सागर साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली संस्कार शेडगे, हर्षवर्धन हुडदुगी, सूरज साळवी, धनश्री फिरमे, साक्षी डांगे, यशश्री राजे, पूजा चौहान, प्रथमेश कदम, यश सावंत, हर्ष बागवे, मंगेश गोवेकर ही राष्ट्रीय नेमबाजांची नवीन फळी तयार झाली आहे. नवीन शस्त्रांबरोबरच नेमबाजांच्या सरावासाठी वापरण्यात येणारी स्कॅट प्रणाली आणि इलेक्ट्रॉनिक टार्गेट सिस्टिमही बसवण्यात येणार आहे. या खेळाचा प्रसार होण्यासाठी शाळांमध्ये जाऊन प्रात्यक्षिके आणि प्रशिक्षण देण्याची सुरुवात संस्थेमार्फत करण्यात आल्याची माहिती संस्थेचे क्रीडा संचालक श्रीकांत पराडकर यांनी दिली.