मनसे अध्यक्ष राज ठाकरे हिंदुत्त्वाचा नारा देत चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. मशिदींवरील भोंग्याच्या मुद्दा अनेक ठिकाणी वादाचे प्रसंग निर्माण करत आहे. सध्या रमजान सुरु असल्याने, ३ मे पर्यंतचा अल्टिमेटम देत तुमचे भोंगे काढा अन्यथा आम्ही हनुमान चालिसा लावू, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे. ३ मे पर्यंतची आमची सर्व तयारी सुरू आहे, आम्हाला शांतता भंग किंवा जातीभेद करायचा नाही आहे. आमचा प्रार्थनेला विरोध नाही पण जर त्यांना लाउड स्पीकर वर ऐकवायचं असेल तर आम्ही ही आरत्या भोंग्यावरच लाऊ, असं राज ठाकरे यांनी रोखठोक सांगितले आहे.
ऐन मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंनी हिंदुत्त्वाचा नारा देत जोरदार सभा घेत आणि कार्यक्रमांना हजेरी लावायला सुरूवात केली आहे. तर पुणे दौऱ्या दरम्यान राज ठाकरेंनी अंगावर भगवी शाल ओढत मारूतीची महाआरती केली. मात्र, याच मुद्द्यावरून शिवसेना नेते व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी काका राज ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे.
अंगावरचे कपडे बदलून हिंदुत्त्व येत नाही. त्यासाठी हिंदुत्त्व हे रक्तात असावं लागतं, असं म्हणत आदित्य ठाकरेंनी राज ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे. तर आमच्या हृदयात आणि रक्तात हिंदुत्त्व आहे, असंही आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले. खास. संजय राऊत यांच्यासोबत चर्चा झाली आहे. दौऱ्यावर कधी जायचे आहे. याचा लवकरच निर्णय घेतला जाणार आहे, मे महिन्यात अयोध्याला जाण्याचा विचार आहे. पण कोणत्या तारखेला जाणार हे लवकरच सांगितलं जाईल, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.
१ मे रोजी महाराष्ट्र दिनी संभाजीनगर येथे जाहीर सभा घेणार आहे आणि ५ जूनच्या दिवशी अयोध्येला जाणार आहे. ५ तारखेला सहकाऱ्यांना सोबत घेऊन अयोध्येला जाणार आहे, अशी घोषणा राज यांनी केली आहे.