नगरपालिका इमारत, ग्रॅव्हिटी पाणीयोजना व अन्य महत्त्वाच्या प्रकल्पांना चालना देण्याची गरज असताना अधिकाऱ्यांअभावी नगरपालिकेचा कारभार काहीसा मंदावला आहे. बांधकाम तसेच पाणीपुरवठा अभियंता ही दोन्ही महत्त्वाची पदे रिक्त असल्याने शहरातील मोठ्या प्रकल्पांना खीळ बसली आहे. केडर अंतर्गत असलेली ही पदे तातडीने भरण्याची मागणी होत आहे. सध्या चिपळूण नगरपालिकेत विविध विभागांत अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या केडर अंतर्गत बदलीने नियुक्त्या झाल्या आहेत. यामध्ये चिपळूण नगरपालिकेतील बांधकाम अभियंता प्रणोल खताळ व पाणीपुरवठा अभियंता नागेश पेठे यांची बदली झाली; परंतु अद्याप नव्या अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या झालेल्या नाहीत.
या व्यतिरिक्त विद्युत अभियंता, संगणक अभियंता व कर प्रशासकीय सेवा आदी प्रमुख विभागांतून अधिकारी नव्याने कार्यरत झाले; परंतु बांधकाम व पाणीपुरवठा या महत्त्वाच्या विभागाला अद्याप अधिकारी मिळालेला नाही. कोळकेवाडी धरणातून शहरात ग्रॅव्हिटीने पाणीपुरवठा करणारी पाणीयोजना हाती घेण्यात आली आहे. या योजनेसाठी नुकतीच निविदा प्रक्रिया पूर्ण करून नाशिक येथील ठेकेदार कंपनीला कामाचा आदेश देण्याची प्रक्रिया सुरू आहे. याचबरोबर नगरपालिका इमारतदेखील धोकादायक झाली असून, या इमारतीच्या आवारात तसा फलक देखील लावण्यात आला आहे. आगामी नगरपालिका निवडणुका लक्षात घेता त्या आधी या इमारतीचे बांधकाम पूर्ण होण्याची आवश्यकता होती; मात्र बांधकाम अभियंताच नसल्याने हेही काम रखडले आहे. त्यामुळे या महत्त्वाच्या कामांसह शहरातील अन्य प्रकल्पांना गती मिळण्याची शक्यता धूसर झाली आहे.
काही नियुक्त्या झाल्या, पण… – प्रशासकीय कामकाजाला गती मिळण्याच्या दृष्टीने दिलासा देणारी बाब म्हणजे बांधकाम विभागात स्थापत्य अभियंत्यांची नियुक्ती झाली असून, कोयना येथील दीपक निंबाळकर, विद्युत अभियंता म्हणून येथील संगीता तांबोळी, संगणक विभागात संगणक अभियंता म्हणून लांजा येथील निवेदिता आंबेकर, कर व प्रशासकीय सेवा विभागात कराड येथील सागर शेडगे आदी नियुक्त्या झाल्या आहेत. संबंधितांनी आपापल्या विभागाचा कार्यभार सुरू केला आहे; मात्र अद्यापही पाणीपुरवठासहित बांधकाम विभागातील नगर अभियंता व सहायक अशी पदे भरणे गरजेचे आहे.