काही दिवसांपूर्वी कुरधुंडा बौद्धवाडी येथून बेपत्ता झालेल्या आशिष प्रकाश मोहिते या ४२ वर्षीय प्रौढाचा मृतदेह कुरधुंडा -कोळंबे या दोन गावाच्या सीमेवर असलेल्या बसस्टॉपच्या मागे झाडीझुडपात कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या मृत्यूविषयी उलटसुलट चर्चा सुरू आहेत. कुटुंबाने आणि पोलीसांनी पत्रकारांना दिलेल्या माहितीनुसार, आशिष मोहिते याला दारूचे व्यसन होते. तो दोन ते तीन दिवस घरात कोणाला काहीही न सांगता कोठेही राहत असे. आशिष याचे वडील प्रकाश विठोबा मोहिते यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीप्रमाणे, १२ ऑक्टोबर रोजी कोळंबे येथे जातो असे सांगून आशिष घरातून निघून गेला होता. मात्र तो परत न आल्याने गावात तसेच नातेवाईकांकडे चौकशी करण्यात आली. मात्र त्याचा पत्ता लागला नाही.
तो मित्रांकडे किंवा नातेवाईकांकडे असेल, ‘तो परत घरी येईल, असा समज करून त्यांनी अधिक चौकशी केली नाही. दरम्यान कुरधुंडा -कोळंबे या दोन गावाच्या सीमेवर असलेल्या बसस्टॉपच्या मागे झाडीझुडपात आशिषचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह दिसून आला. ही माहिती प्रकाश मोहिते यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी संगमेश्वर’ पोलीस ठाण्यात तशी फिर्याद नोंदवली असून आकस्मिक मृत्यू म्हणून संगमेश्वर पोलिसांकडून नोंद करून अधिक तपास सुरु आहे.

