अमावास्या आणि अशा अघोरी प्रथांच्या कथा कोकणवासियांना काही नविन नाहीत. भूताखेतांच्या कथा तर कोकणात पावलोपावली ऐकायला मिळतात. पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवत अंधश्रध्देतून घडलेले नांदोस हत्याकांड आजही अनेकांना आठविते. या सर्व पार्श्वभूमीवर ऐन दिवाळीत अमावास्येच्या रात्री देऊळवाडा येथील स्मशानभूमीत हा प्रकार घडल्याने मालवणसह आसपासच्या परिसरात खळबळ उडाली आहे.
नेमके काय झाले ? – मंगळवारी ऑक्टोबर रोजी अमावास्या होती. दीपोत्सवातील या अमावास्येला मोठे महत्व आहे.. या अमावास्येला सायंकाळी लक्ष्मीपूजन केले जाते. व्यापारी, व्यावसायिक आपापल्या दुकानांमध्ये किंवा कार्यालयांमध्ये मोठ्या उत्साहात लक्ष्मीपूजन करतात. घरोघरीसुध्दा लक्ष्मीपूजनाची परंपरा शेकडो वर्षे सुरू आहे. २१ ऑक्टोबरला मालवण आणि परिसरातदेखील मोठ्या उत्साहात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत लक्ष्मीपूजन करण्यात आले. लक्ष्मीपूजन संपल्यानंतर अचानक सोशल मिडियाच्या माध्यमातून काहीजणांना देऊळवाडा स्मशानभूमीत नग्नपूजा सुरू असल्याची खबर मिळाली.
हा हा म्हणता पसरली – सोशल मिडियावर आलेली ही खबर हा हा म्हणता संपूर्ण मालवण देऊळवाडा परिसरात पसरली. त्याची जोरदार चर्चा सुरू झाली. काही धाडसी मंडळींनी मध्यरात्र असतानादेखील देऊळवाडा स्मशानभूमीत काय सुरू आहे, हे जाऊन पाहण्याचा निश्चय केला. अनेक मंडळी स्मशानभूमीत आली.
नग्नावस्थेत पूजा – काय चाललंय ते पाहण्यासाठी स्मशानभूमीत दाखल झालेली मंडळी समोरचे दृश्य पाहून अवाक् झाली. अमावास्येच्या काळोख्या रात्री मिट्ट अंधारात एक तरूण पूजा करताना दिसला. त्याच्या अंगावर एकही वस्त्र नव्हते. नग्नावस्थेत तो ही पूजा करत होता. मंडळींनी थोडे अधिक जवळ जाऊन पाहिले तेव्हा त्यांना एक वर्तुळ काढण्यात आल्याचे दिसले. या वर्तुळाच्या मध्यभागी लाल रंगाने त्रिकोण काढण्यात आला होता.
कुवाळ्यात पूजा मांडली – या त्रिकोणात कुवाळ्यामध्ये पूजा मांडण्यात आली होती. मध्यभागी एक तेलाचा दिवा पेटविण्यात आला होता. त्रिकोणाच्या भोवती लिंबू. हळद-कुंकू, काळे कापड, तांदूळ, अगरबत्ती लावण्यात आली होती. मोठा काकडादेखील पेटविण्यात आला होता.
नग्न तरूण – या सर्व साहित्याभोवती एक तरूण पूजा करत होता. काही वेळानंतर हा तरूण उभा राहिला. त्याच्या अंगावर वस्त्र नव्हते. उभा राहंताच त्याने जप करण्यास सुरूवात केली. भयाण शांततेत तो जो काही जप करत होता त्याचे पुटपुटणे लोकांना कळत नव्हते. मात्र त्यामुळे वातावरण अधिकच भयावह झाल्यासारखे वाटले, असे नंतर एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले. हे काय चालले आहे, तेच कळेनासे झाल्याने आलेल्या नागरिकांपैकी काहीजणांनी पुढे जात त्या तरूणाला पकडले आणि काय चाललेय, असा जाब विचारला. त्याची थातूरमातूर उत्तरे या तरूणाने दिली. तेव्हा मंडळींचा संशय बळावला.
पोलीसांना खबर – नागरिकांनी काही जागरूक मोबाईलवरून थेट पोलीसांना खबर दिली आणि नग्नावस्थेत पूजा करणाऱ्या त्या तरूणाला पकडले. पोलीस येताच त्याला त्यांच्या ताब्यात देण्यात आले. पोलीसांनी या तरूणाला ताब्यात घेतले. गावकरी मंडळींनी तेथे त्याने मांडलेली पूजा हटवून तत्काळ जागा मोकळी करावी, अशी मागणी केली. पोलीसांनी तसा आदेश देताच त्या नग्नावस्थेतील तरूणाने आपले पूजासाहित्य तेथून हटविल्याची चर्चा सुरू आहे. मध्यरात्री हा सारा प्रकार झाला. पोलीस त्याला घेऊन गेले आणि गांवकरी मंडळी घरोघरी परतली.
कारण काय ? चर्चाना पेव – मंगळवारी अमावास्येच्या रात्री देऊळवाडा स्मशानभूमीत जे काही घडले त्याची चर्चा बुधवार सकाळपासूनच म ालवणात आणि हळूहळू परिसरात सुरू झाली आहे. नाक्यानाक्यांवर गजाली रंगल्या आहेत. प्रत्येकजण आपल्या अंदाजानुसार मतं मांडत आहे.
गुप्तधनासाठी की अन्य काही कारणांसाठी? – ही पूजा नेमकी कशासाठी करण्यात आली याचे अधिकृत कारण स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे त्याविषयी अधिक चर्चा सुरू आहेत. कुणाला ही अघोरी साधना हा बुवाबाजीचा, भगतगिरीचा प्रकार वाटतो आहे, तर काहीजणांना गुप्तधनाच्या शोधासाठी ही पूजा मांडली गेली असे वाटत आहे. तांत्रिक, मांत्रिक, जादूटोणा करणी, मूठ मारणी असे अनेक संशय व्यक्त होत आहेत.
थेट निवडणुकीशी संबंध? – काहीजणांनी तर या अघोरी पूजेचा संबंध थेट लवकरच होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांशी जोडण्याचा प्रयत्न केला आहे म्हणजे तशी चर्चा सुरू आहे. आपल्या विरोधकांना निवडणुकीपूर्वीच गारद करण्यासाठी तंत्रमंत्र, जादूटोणा याचा आधार कोकणात याआधीही अनेकांनी घेतल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे ऐन मध्यरात्री स्मशानभूमीत नग्नावस्थेत करण्यात आलेली ही अघोरी पूजा म्हणजे काहीजणांनी आपल्या संभाव्य प्रतिस्पर्धी उमेदवाराला निवडणुकीतून बाद करण्यासाठी किंवा आपला विजय सुकर करण्यासाठी जादूटोणा, तंत्रमंत्रचा आधार घेत हे कृत्य केले असावे, अशी चर्चा सुरू आहे. जोपर्यंत खरे कारण पुढे येत नाही, तोपर्यंत या चर्चाना उधाण येतच राहणार आहे.

