मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे तालुक्याच्या ग्रामीण भागातील बहुतांश काम पूर्ण झाले आहे; मात्र शहरातील एसटी डेपोसमोरील रस्त्याचे काम गेल्या काही महिन्यांपासून अर्धवट स्थितीत आहे. बंगलवाडी, गुरववाडीकडे जाणारा सर्व्हिस रोड, पाण्याची पाईपलाईन, पथदीप व्यवस्थेचे काम रखडले आहे. रखडलेली ही कामे मार्गी लागण्यासाठी लोकांकडून सातत्याने आवाज उठवला जात आहे; मात्र ठेकेदार कंपनीकडून होत असलेल्या दिरंगाईबाबत प्रशासनाकडून डोळेझाक केले जात असल्याने लोकांकडून याबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. याबाबत शहरातील गुरववाडीतील ग्रामस्थांनी उपोषण छेडण्याचा इशारा दिला आहे.
याचे निवेदन माजी नगरसेवक विनय गुरव आणि गुरववाडी येथील ग्रामस्थांनी प्रांताधिकारी यांना दिले. प्रजासत्ताक दिनी (ता. २६) उपोषण प्रांताधिकारी कार्यालय येथे छेडण्यात येणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. अर्धवट स्थितीतील या रस्त्याचा फटका या भागातील बँका, व्यापारी, दुकानदारांना बसत असून आर्थिक नुकसान होत आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला वसलेल्या वाड्यांमधील लोकांना धोकादायकरित्या प्रवास करावा लागत आहे. रखडलेल्या कामावर योग्य तोडगा काढून येथील रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्याची सातत्याने लोकांकडून मागणी केली जात आहे.