भाट्ये खाडीचे मुख असलेल्या मांडवी बंदरातील गाळ उपसा करण्यासाठी जमातुल मुस्लिमिन राजिवडा कोअर कमिटी पुरस्कृत मच्छीमार संघर्ष समितीने राजिवडा, फणसोप, भाट्ये आणि सोमेश्वर येथे आयोजित केलेल्या बैठकांना मच्छीमारांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. मच्छीमारांकडून या लढ्याला पाठिंबा मिळत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर २६ जानेवारीला करण्यात येणाऱ्या बेमुदत आंदोलनाला मच्छीमार मोठ्या प्रमाणात उपस्थित राहणार आहेत. भाट्ये खाडी परिसरातील मच्छीमारांचा मासेमारी हा मुख्य व्यवसाय आहे. गेल्या अनेक वर्षांपासून भाट्ये खाडीचा परिसर गाळाने साचलेला आहे. मात्र, भाट्ये खाडीचे मुख असलेल्या मांडवी बंदर हेही गाळाने भरल्याने मच्छीमारांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
मांडवी बंदरातून समुद्रात ये-जा करण्यासाठी मासेमारी नौकांना समुद्राला येणाऱ्या भरतीची वाट पाहावी लागते. या गाळामुळे अनेकदा नौका बुडून लाखो रुपयांचे मच्छीमारांचे नुकसान झाले आहे शिवाय नौकांवरील खलाशी बुडाल्याच्या दुर्दैवी घटनाही येथे घडलेल्या आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून मांडवी बंदरातील गाळ उपसा करण्याबाबत राजिवडा, कर्ला, फणसोप आणि भाट्ये येथील मच्छीमार संस्थांकडून मागणी करण्यात आलेली असतानाही त्याकडे शासनाकडून दुर्लक्ष करण्यात आले. त्याचे दुष्परिणाम म्हणून खाडी परिसरातील मच्छीमारांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे.
त्यामुळे मागील दोन वर्षांपासून गाळाचा प्रश्न मच्छीमार संघर्ष समितीने हाती घेतला आहे. त्यासाठी अनेकदा शासनाकडे निवेदने देऊनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. अखेर संघर्ष समितीने गाळाच्या प्रश्नासंदर्भात लढा अधिक तीव्र करण्यासाठी २६ जानेवारीपासून बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय जाहीर करून शासनाला त्याबाबतचे निवेदनही दिले. वेगवेगळ्या गावातील बैठकांमध्ये नजीर वाडकर, इम्रान सोलकर, शब्बीर भाटकर, सईद फणसोपकर, शफी वस्ता, फकीर मिरकर, रहिम दलाल, लुकमान कोतवडेकर, दरबार वाडकर, मुनीर मुकादम, युसुफ भाटकर, अरमान ‘भाटकर, जाविद होडेकर, अझिम होडेकर, मजहर मुकादम, अतिक गडकरी, दिलावर मुकादम यांनी नेतृत्व केले.