लोटे येथील ‘भगवानदास’ कोकरे बुवाच्या तथाकथित निवासी गुरुकूलमध्ये आणखी एक ‘वासनाकांड’ घडल्याची तक्रार पोलिस स्थानकात दाखल झाली आहे. या गुरुकुलातील एका विद्यार्थी मॉनीटरने अन्य अल्पवयीन मुलांशी संतापजनक गैरवर्तन केले.. त्यांना भर वर्गात नग्न करुन त्यांची छायाचित्रे घेतली व व्हिडीओ देखील घेतले. तसेच या अल्पवयीन मुलांना त्याने नको ती व्यसने लावण्याचा देखील प्रयत्न केला.. त्यांचे जणू लैंगिक शोषण व त्यांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला.. त्याची तक्रार एका मुलाच्या वडिलांनी थेट लोटे पोलिस स्थानकात जाऊन दाखल केली आणि मग या घटनेला वाचा फुटली.. त्याचे गुरु ‘भगवानदास’ कोकरे बुवा यांचा वारसा बहुदा तो विद्यार्थी मॉनीटर चालवित असावा.. गुरुने तसे केले असेल तर मग आपणही तसे काही केले तर काय बिघडले? असा ‘पोक्त’ विचार बहुदा त्या अल्पवयीन मॉनीटरने केला असावा! लोटे येथील कोकरे बुवाचे गुरुकूल मागील काही दिवसांपासून वादात सापडले आहे. या गुरुकुल मध्ये वासनाकांड घडल्याच्या एक नव्हे तर दोन तक्रारी दस्तुरखुद्द भगवान कोकरे बुवाविरुध्द पोलिस स्थानकात दाखल झाल्या.
कोकरे बुवा कस्टडीत – या कोकरे बुवाविरुध्द व त्याच्या साथीदारा विरुध्द लागोपाठ २ तक्रारी पीडीत अल्पवयीन मुलींनी दाखल केल्याने त्यांच्या विरुध्द एकदा नव्हे तर दोन वेळा ‘पोस्को’ कायद्यान्वये गुन्हा रजिस्टर करण्यात आला. त्या दोघांनाही २ गुन्ह्यात २ वेळा अटक झाली असून त्यांना ३१ ऑक्टो. पर्यंत कोठडीत ठेवण्याचा कोर्टाने आदेश दिला, त्यामुळे ते दोघेही सध्या कोठडीचा पाहुणचार घेत आहेत.
नरक चतुर्दशीला तक्रार – अशा स्थितीत सोम. दि. २० ऑक्टो. म्हणजे नरक चतुर्दशीचे दिवशी या गुरुकुला संदर्भात आणखी एक तक्रार क्रार लोटे पोलिस स्थानकात दाखल झाली. ही तक्रार श्री. चंद्रकांत धोत्रे या पालकांनी दाखल केली आहे. त्याबाबत दाखल झालेल्या एफआयआरची माहिती पोलिसांनी पत्रकारांना दिली. त्या एफआयआर मध्ये नमुद करण्यात आले आहे की, “तक्रार देणार श्री. चंद्रकांत धोत्रे हे लोटे येथे राहतात. त्यांच्या पत्नीचे वास्तव्य कामानिमित्त मुंबईला असते. त्यांनी आपली दोन्ही मुले शिक्षणासाठी लोटे येथील भगवान कोकरे यांच्या गुरुकुलमध्ये ठेवली होती”
पैंट काढून नग्न केले – तक्रारीत पुढे नमूद करण्यात आले आहे की, “त्यांनी आपला १५ वर्षांचा अल्पवयीन मुलगा व मुलगी अशा दोघांना त्या गुरुकुलमध्ये जून २०२५ मध्ये शिक्षणासाठी ठेवले. मुलाला विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने मला सांगितले की गुरुकुलातील विद्यार्थ्यांचा मॉनीटर म्हणून नेमणूक केलेला मुलगा त्यांना त्रास देतो. सप्टेंबरमधील एका रविवारी मुलगा हॉलमध्ये असताना त्या मॉनीटरने त्याची हाफपँट काढून त्याला नग्न केले व कुणाला काही सांगायचे नाही अशी धमकी दिली” असे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे.
लैंगिक शोषणचा गुन्हा – त्या तक्रारीत पुढे नमूद करण्यात आले आहे की, “असेच प्रकार त्या म ॉनीटरने एका ९ वर्षे व दुसऱ्या १२ वर्षे वयाच्या मुलांबाबतीतही केले. तसेच हॉलमध्ये असलेल्या इतर मुलांसोबत देखील त्या मॉनीटरने अशी गैरकृत्ये करुन त्यांचे त्यांनी मोबाईलवर फोटो काढले व व्हिडीओ तयार केले. इतर मुलांचेही त्याने असे फोटो व व्हिडीओ काढले, त्यांचे लैंगिक शोषण केले व त्यांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. तसेच कुणाला काही सांगायचे नाही अशी धमकी दिली असे मुलाने मला सांगितले. त्याचबरोबर तो मॉनीटर मुलगा गुरुकूलमधील मुलांना तंबाखू व सिगरेट ओढण्यास सांगत असे” असे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.
म्हणे तो मर्द नव्हे ! – त्या तक्रारीत त्यांनी पुढे म्हटले आहे की, “तो मॉनीटर पोरगा अन्य मुलांना तंबाखू व सिगरेट ओढण्यास सांगत असे आणि जो मुलगा त्याला तयार नसे त्याला तो मॉनीटर पोरगा ‘तंबाखू व सिगरेट ओढत नाही तो मर्द नाही’ असे खिजवत असे” असे लोटे पोलिस स्थानकात तक्रार दाखल करणाऱ्या पालकांनी आपल्या तक्रारीत नमूद केले आहे. याप्रकरणी लोटे पोलिस स्थानकात गुन्हा रजि. नं. ०३१५/२०२५ या क्रमांकाने भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३ चे कलम ७४, ७९, १३१, ३५२, ३५१ (२) अन्वये नोंदविण्यात आला असून त्याप्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक श्री. विवेक अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.
वासनाकांडाची लागण ! – भगवान कोकरे बुवाच्या या गुरुकुलाबद्दल ही तक्रार दाखल झाल्यानंतर त्याचे वृत्त हा हा म्हणता साऱ्या परिसरात पसरले आणि मग चर्चेला उत आला. ‘भगवानदास’ कोकरे बुवाचा वारसा बहुदा तो विद्यार्थी मॉनीटर चालवित असावा.. कोकरे बुवा जर तसे करत असेल तर मग आपण का करु नये असा त्याने सूज्ञ विचार केला असावा अशी चर्चा साऱ्या परिसरातील जनतेत सुरु झाली.. एकूण काय थोरांपासून ते लहानांपर्यंत गुरुकुलातील अनेकांना बहुदा वासनकांडाची ‘लागण’ झाली असावी.

