कोकण रेल्वे मार्गावर मध्यरेल्वे प्रशासनाने ‘वातानुकूलित स्पेशल’ गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार एलटीटी-करमाळी वातानुकूलित साप्ताहिक स्पेशल ११ एप्रिलपासून धावणार आहे. ८ एप्रिलपासून स्पेशलच्या फेऱ्यांचे आरक्षणही खुले झाले आहे. उन्हाळी सुटीच्या हंगामात नियमित रेल्वेगाड्या हाऊसफुल्ल धावतात. रेल्वेगाड्यांना प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्यरेल्वे प्रशासनाकडून एकामागोमाग एक उन्हाळी स्पेशल जाहीर केल्या जात असल्याने चाकरमान्यांसह पर्यटक कमालीचे सुखावत आहेत. आतापर्यंत मध्यरेल्वे प्रशासनाने सहा उन्हाळी स्पेशलच्या फेऱ्या जाहीर केल्या असून, त्यातील तीन उन्हाळी स्पेशलच्या फेऱ्या कोकण मार्गावर धावतही आहेत. या फेऱ्यांत वातानुकूलित स्पेशलही दाखल होणार आहे.
ही एलटीटी-करमळी वातानुकूलित साप्ताहिक स्पेशल (क्र. ०१०५१/०१०५२) ११ एप्रिल ते २३ मे दरम्यान दर शुक्रवारी धावेल. एलटीटीहून रात्री १०.१५ वाजता सुटणारी स्पेशल दुसऱ्या दिवशी सकाळी १२ वाजता करमळीला पोचेल. परतीच्या प्रवासात १२ एप्रिल ते २४ मे दरम्यान दर शनिवारी धावणारी स्पेशल करमळी येथून दुपारी २.३० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे ४.०५ वाजता एलटीटीला पोहचेल. २० एलएचबी डब्यांची स्पेशल ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, आडवेली, विलवडे, राजापूर, वैभववाडी, नांदगाव, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी, थिवी स्थानकात थांबेल.