बैठकीला आला म्हणजे चहा-पाण्यासाठी नाही बोलावले. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण बैठक बोलावली आहे. आलात ते आलात खात्याची अपूर्ण माहिती घेऊन आलात. हा गलथान कारभार चालणार नाही. या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावा, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देत भारत दूरसंचार निगमच्या (बीएसएनएल) अधिकाऱ्यांना लांजा-राजापूरचे आमदार किरण ऊर्फ भैया सामंत यांनी चांगलेच फैलावर घेतले. बीएसएनएलचा हा कारभार सुधारला नाही, जिल्हाधिकारी, लोकप्रतिनिधींना किंमत दिली नाही तर कार्यालयाला टाळे ठोकू, असा दमही त्यांनी भरला. जिल्हाधिकारी कार्यालयात आज दुपारी जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत त्यांनी हे खडेबोल सुनावले. आमदार किरण सामंत यांच्याकडे राजापूर, लांजा, साखरपा, रत्नागिरी आदी तालुक्यातून बीएसएनएलच्या नेटवर्कच्या तक्रारी आल्या होत्या.
त्या तक्रारीच्या अनुषंगाने बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांना संपूर्ण माहिती घेऊन बैठकीला बोलावण्यात आले होते. बीएसएनएलची दर्जेदार सेवा देण्यामध्ये काय अडचणी आहेत हे जाणून घेण्यासाठी बैठक होती; परंतु केंद्र शासनाची ही एजन्सी असल्याने स्थानिक अधिकारी तक्रारींचा विचार करत नाही. जिल्हा प्रशासन किंवा लोकप्रतिनिधींना किंमत देत नाहीत, असा एकूण सूर होता; परंतु बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांना किरण सामंत यांनी चांगलेच सुनावले.
… तर गाठ माझ्याशी आहे – गावागावांमध्ये बीएसएनएलची रेंज नसल्याने काय काय अडचणींचा लोकांना सामना करावा लागतो माहीत आहे का? याचा विचार कधी केला आहे का? अतिशय बेजबाबदारपणाने तुमचे वागणे आहे. लांजा-राजापूर विधानसभेचा आमदार मी आहे. आमच्या तक्रारींची दखल घेतली नाही, जनतेचे प्रश्न सोडवले नाही तर गाठ माझ्याशी आहे. आठ दिवसामध्ये संपूर्ण माहिती घेऊन पुन्हा बैठक घेतली जाईल. सुधारणा झाली तर ठीक नाहीतर बीएसएनएलच्या कार्यालयाला टाळे ठोकू, असा दम आमदार किरण सामंत यांनी भरला.
येणाऱ्या अडचणी – फोनवर बोलताना झाडावर चढावे लागत, विद्यार्थ्यांचा ऑनलाईन अभ्यास होत नाही, रेशन दुकानावर रेंजअभावी धान्य मिळत नाही, आरोग्याच्या सुविधांसाठी अनेक अडचणी येतात.