मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही, हा माझा शब्द. उलट पंधराशेचे २ हजार करण्याची जबाबदारी आम्ही स्वीकारतो. महिलांची आर्थिक उन्नती ही योजना आहे. जिल्ह्यातील ४ लाख महिला याचा लाभ घेत आहेत. विरोधकांनी ही योजना बंद करण्यासाठी उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयात गेले; परंतु त्यांना यश आले नाही. ही योजना बंद करणाऱ्यांना सर्व महिलांनी धडा शिकवण्याची वेळ आली आहे, असे आवाहन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले. आचारसंहिता लागण्यापूर्वी ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्याचे हप्ते ९ तारखेला महिलांच्या खात्यात जमा होणार, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना, महिला सशक्तीकरण योजना व महिलांच्या संबंधित राबवण्यात येत असलेल्या इतर योजना महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रमोद महाजन क्रीडा संकुलात आयोजन मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, अपर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड आदी उपस्थित होते. मंत्री सामंत म्हणाले, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी दरवर्षी ४६ हजार कोटींची तरतूद केली आहे. शासनाने दिलेले ३ हजार हे महिलांसाठी ३ लाखांसारखे आहेत. या पैशातून महिला स्वतःसाठी औषधोपचार करत आहेत. शिवण क्लाससाठी प्रवेश घेत आहेत. त्यातून व्यवसाय वृद्धी करत आहेत.
कुटुंबातील सदस्यांवर खर्च करत आहेत. हा त्यांचा आनंद समाधान देऊन जातो. ही योजना महिला भगिनींपर्यंत पोहोचवणाऱ्या अंगणवाडी सेविका, सीआरपी यांना धन्यवाद दिले पाहिजेत. ३० हजार कोटींचे प्रकल्प रत्नागिरीत आणू शकलो. यामधून मोठा रोजगार उपलब्ध होणार आहे. मुंबईला नोकरीसाठी जायची आता गरज नाही. लेक लाडकी, वयोश्री, तीर्थदर्शन, युवा कार्य प्रशिक्षण, अन्नपूर्णा या सर्व योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांनी घ्यावा. येत्या ९ तारखेला ऑक्टोबर व नोव्हेंबर या २ महिन्यांचे पैसे खात्यावर जमा होतील, असेही सामंत म्हणाले. यावेळी विविध विभागांच्या लाभार्थ्यांना लाभ मंजुरीचे प्रमाणपत्र, धनादेश देण्यात आला.
महिलांच्या परतीच्या प्रवासाचे हाल – या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने महिला सकाळी अकरा ते बारापासून रत्नागिरीत आल्या होत्या. यासाठी एसटीच्या गाड्यांचे नियोजन केले होते; परंतु कार्यक्रम उशिरा सुरू झाल्यामुळे महिलांना ताटकळत बसावे लागले. परतीच्या प्रवासासाठी महिलांना सायंकाळी चार ते पाचपर्यंत रस्त्यावर उभे राहून गाड्यांची वाट पाहावी लागली. उकाड्यामुळे हैराण महिलांचे नियोजनाच्या अभावामुळे प्रचंड हाल झाले.