पावसाळ्यात दूषित पाणी वाहून आल्यामुळे ग्रामीण व शहरी भागात साथरोगांचा प्रादुर्भाव होतो. नदीकाठच्या गावांमध्ये काविळ, हगवण, अतिसार, लेप्टोस्पायरोसिस, माकडताप, तर शहरी भागात डेंगी अशा विविध आजारांच्या साथी पावसाळ्यात पसरतात. अशा वेळी पाणीपुरवठा योजनांच्या माध्यमातून वितरित होणाऱ्या पिण्याच्या पाण्यावर योग्य शुद्धीकरण प्रक्रिया करणे आवश्यक असून पावसाळ्यात पाणी उकळून व गार करून पिणे गरजेचे आहे, असे आवाहन जिल्हा परिषद जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरूद्ध आठल्ये यांनी केले आहे. पाणी शुद्ध करण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर पुरेसा टीसीएल साठा उपलब्ध आहे. स्थानिक पातळीवर पाणीपुरवठा करणारे कर्मचारी व जलसुरक्षक यांचे प्रशिक्षण घेण्यात आले आहे.
ग्रामपंचायत स्तरावर सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची प्रत्यक्ष पाहणी करून पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे एप्रिल २०२३ मध्ये स्वच्छता सर्वेक्षण करण्यात आले आहे. साथरोगाचा प्रादुर्भाव झाल्यास त्याची माहिती तत्काळ जिल्हा साथरोग नियंत्रण कक्षाला देण्याबाबत आशा स्वयंसेविका, आरोग्य कर्मचारी, समुदाय आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी व इतर संबंधितांना सूचना दिल्या आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर साथरोग नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र स्तरावर साथरोग औषध कीट अद्ययावत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गृहभेटीमध्ये आरोग्य कर्मचारी व आशा स्वयंसेवक यांच्यामार्फत साथरोगाबाबत, दूषित पाणीपुरवठा होणाऱ्या समस्यांबाबत पुरेशी जनजागृती केल्यास या उपायांची अंमलबजावणी करणाऱ्या शासकीय यंत्रणेच्या प्रयत्नांना जनतेकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो.
हवामान खात्याने दिलेल्या अतिवृष्टीँ व वादळाच्या इशाऱ्याबाबत योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन जिल्हास्तरावरून देण्यात येत आहे. साथरोग नियंत्रणासाठी पाणीपुरवठा’ व ग्रामविकास, कृषी, नगरविकास आणि पशुसंवर्धन अशा विविध विभागांनी नियमित समन्वय ठेवावा. आपल्या कार्यक्षेत्रातील नगरपालिका कार्यक्षेत्रातही साथरोग प्रतिबंध व नियंत्रणासाठी आवश्यक ती पूर्वतयारी करण्यात आली आहे, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.