तालुक्यात शनिवारी दुपारनंतर मुसळधार पावसाला सुरुवात झाली. सोसाट्याच्या जोरादार वाऱ्यासह पडणाऱ्या या पावसामध्ये तालुक्यात कोठेही नुकसान झालेले नाही. पूर्व भागातील पाचल परिसरातील अर्जुना धरण पूर्ण क्षमतेने भरून पाण्याचा सांडव्यावरून विसर्ग होऊ लागला आहे. त्यामुळे अर्जुना नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाली आहे. वाडावेत्ये येथील दत्तात्रय शंकर जाधव (वय ६५) हे आज दुपारी वेत्ये खाडीत बुडाल्याची घटना घडली आहे.
अर्जुना धरणातून पाण्याचा विसर्ग होऊ लागल्याने नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने संभाव्य पूरस्थितीच्या अनुषंगाने सतर्क राहण्याचे आवाहन जलसंपदा विभागाकडून नदीकाठच्या गावांना करण्यात आले आहे. पाचल येथील अर्जुना धरण परिसरामध्ये सुमारे १ हजार २०४ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली असून, त्यातून सद्यः स्थितीमध्ये धरणात सुमारे २.६४ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.