२०२२ या वर्षातील पहिले चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात दाखल झाले आहे. मागील दोन वर्ष देखील कोरोना काळाचे संकट आणि त्यामध्ये दोनवेळा उद्भवलेली नैसर्गिक आपत्तीमुळे जनसामान्यांचे जिणे मुश्कील झाले होते. या येणाऱ्या वादळामुळे अनेक राज्यांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे.
नैऋत्य हिंदी महासागरावरील कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने असनी चक्रीवादळाची व्याप्ती आता बांगलादेश आणि म्यानमारच्या उत्तरेकडील टोकापर्यंत पोहचले आहे. त्यामुळे आग्नेय बंगलाचा उपसागर व लगतच्या दक्षिण अंदमान समुद्रात हालचाली तीव्र होण्याची शक्यता आहे. सध्या तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुढील २४ तासांमध्ये पूर्व मध्य बंगालच्या उपसागरात असनी चक्रीवादळ धडकेल. यामुळे ओडिशा, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश आणि अंदमान निकोबार बेटांवर मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
चक्रीवादळाला श्रीलंकेने ‘असनी’ असे नाव दिले आहे. हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, पुढील २४ तासांमध्ये आग्नेय बंगालचा उपसागर व दक्षिण अंदमान समुद्रात चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. किनार्यावरील जिल्हे, पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता तसेच राज्यातील दक्षिणेकडील काही परिसर मधील नागरिकांना सतर्क राहण्यास सांगितले आहे. दरम्यान, या भागात मच्छिमारांना देखील समुद्रात मासेमारीकरिता न जाण्याचा इशारा दिला आहे.
दरम्यान, ‘असनी’मुळे देण्यात आलेल्या सतर्कतेच्या इशार्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पश्चिम मदिनापूर आणि झारग्राम येथील दौर्यात बदल केला असल्याची माहिती तृणमूल काँग्रेसचे सचिव कुणाल घोष यांनी दिली.
बंगालच्या उपसागरात ज्या वेगाने हे वादळ दाखल झाले त्यावरून ९ मे रोजी बंगाल आणि ओडिशामध्ये ९० किमी/ताशी आणि १० मे रोजी १२५ किमी/ताशी या वेगाने वारे वाहतील, असा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. याचदरम्यान वादळी पाऊसही पडण्याची शक्यता आहे.