सर्वांचे लक्ष असलेल्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरून चाकरमान्यांचा प्रवास काहीसा चांगला होणार असला तरी शहरासह तालुक्यातील अन्य रस्त्यांची अवस्था बिकट आहे. त्यामुळे बाप्पांसह चाकरम न्यांचा अतंर्गत रस्त्यांवरील प्रवास खडतर होणार आहे. सध्या नगर परिषद, सार्वजनिक बांधकाम, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी ठेकेदारांकडून काही मुख्य रस्त्यांचे खड्डे बातूर-मातूर पध्दतीने मरून घेत आहेत. मात्र गावा-गावातील रस्त्यांची अवस्था बिकट आहे. तरीही लोकप्रतिनिधी शांत का, असा सवाल गणेशभक्तांमधून उपस्थित होत आहे.
गेल्या कित्येक वर्षापासून मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम रखडले आहे. त्यामुळे होणारी ओरड, लोकप्रतिनिधींवर होणारे आरोप याचा विचार करता गणेशोत्सवापूर्वी एक लेन तरी चांगली करण्यावर भर देण्यात आला आहे. मात्र ते कामही सर्वच ठिकाणी पूर्ण होणे कठीण झाले आहे. त्यामुळे चाकरमान्यांचा प्रवास काहीसा सुखकर होणार असला तरी काही ठिकाणी खड्डयातूनच गाव गाठावे लागणार आहे. मात्र तरीही गतवर्षीच्या गणेशोत्सवातील महामार्गाची परिस्थिती पाहता यावर्षी ती थोडी चांगली आहे, असे म्हणावे लागेल. असे असले तरी शहराचा विचार करता सध्या एकही रस्ता सुस्थितीत नाही.
विशेष म्हणजे हे सर्व उखडलेले रस्ते हमी कालावधीत आहेत. तरीही नगर परिषद प्रशासन ठेकेदारांकडून काहीही करून न घेता सध्या ग्रीट टाकून खड्डे भरण्याचा केविलवाणा प्रयत्न करताना दिसत आहे. चिपळूण-गुहागर, उक्ताड बायपास या मुख्य रस्त्यांवरून खड्डे सार्वजनिक बांधकाम व राष्ट्रीय महामार्ग विभाग ठेकेदारांकडून भरून घेत आहेत.