वनविभागाने देशी झाडे लावावीत वनविभाग कार्यालय परिसरात परदेशी झाडाऐवजी देशी झाडे लावली तर ती झाडे पाहायला नागरिक येतील. खैर नर्सरीप्रमाणे बांबू नर्सरी करावी जेणेकरून शेतकऱ्यांना लागवडीसाठी मोठ्या प्रमाणात बांबू रोपे उपलब्ध होतील, असे प्रतिपादन आमदार शेखर निकम यांनी केले. चिपळूण वनविभागातर्फे फोटो गॅलरी कम कॉन्फरन्स हॉलचे उद्घाटन करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी प्रांताधिकारी आकाश लिगाडे, विभागीय वनाधिकारी गिरिजा देसाई, मुख्याधिकारी विशाल भोसले, सहायक वनरक्षक प्रियंका लगड, भाऊ काटदरे, उपविभागीय कृषी अधिकारी शिंदे उपस्थित होते.
आमदार निकम म्हणाले, ही फोटो गॅलरी कम कॉन्फरन्स हॉल चिपळूणच्या सौंदर्यात भर घालणारीच आहे; मात्र यामध्ये महिन्यातून किमान एकदा विद्यार्थी वा नागरिकांसाठी निसर्गाशी निगडित व्याख्यान मालिका सुरू झाल्यास खऱ्या अर्थाने याचा उपयोग नागरिकांना होईल. तालुक्यातील सरपंचांची येथे सभा घेऊन वनविभागाच्या योजनांची माहिती देण्यात यावी. सध्या सुरू असलेल्या जंगलतोडीबाबत सर्वांनीच आवाज उठवला पाहिजे. निसर्गाचे संगोपनदेखील केले पाहिजे. प्रांताधिकारी लिगाडे म्हणाले, कोकणाची पर्यटन म्हणून प्रसिद्धी नाही, ती करावी, लोकांना माहिती द्यावी म्हणजे पर्यटन वाढेल. त्याबरोबरच विदर्भाप्रमाणे इकडेही बौद्ध पौर्णिमेला प्राणी गणना करावी. येथील असणाऱ्या प्राणी आणि पक्ष्यांचा निश्चित आकडा मिळेल.
दालनाला नीलेश बापट यांचे नाव द्या – या छायाचित्र दालनाला निसर्गप्रेमी नीलेश बापट यांचे नाव द्यावे, अशी मागणी सर्व मान्यवरांनी केली. यावर आपले मत मांडताना आमदार निकम म्हणाले, माझीही इच्छा आहे. स्व. नीलेश बापट यांचेच नाव या गॅलरीला द्यावे. तसा प्रस्ताव मी पालकमंत्री यांच्याकडे दिला आहे; मात्र तो प्रशासनाचा निर्णय आहे. आपण आजपासूनच स्व. नीलेश बापट गॅलरी असे नामकरण करू आणि तशी पाटी लावू आणि प्रचार करू जेणेकरून त्याचा प्रसार होऊन नाव देण्यात येईल.
अभयारण्यापेक्षा कोकणात निसर्गसंपदा – कोकणात विविध प्रकारचे प्राणी, पक्षी, वाघ, बिबटे आहेत. हेच प्राणी, पक्षी बघायला लोक ताडोबासारख्या अभयारण्यात जातात; पण त्याहीपेक्षा प्राणी, वातावरण, निसर्गसंपदा कोकणाला लाभली आहे; मात्र त्याची पर्यटन प्रसिद्धी होत नाही. ती झाल्यास निश्चितच पर्यटन वाढेल.