आज सोमवार दि. १८ एप्रिलपासून देशभरातील बँकाच्या वेळेमध्ये बदल करण्यात आला असून, आता बँका सकाळी ९ वाजता पासून उघडणार आहेत. त्यामुळे देशभरातील विविध बँकांच्या कोट्यवधी ग्राहकांना याचा लाभ घेता येणार आहे. अर्थात, ग्राहकांना आपले बँकिंग काम करून घेण्यासाठी एक तास अतिरिक्त मिळणार आहे. हा आदेश देशातील ७ सरकारी आणि २० खाजगी बँकांना लागू करण्यात आला आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेने याबाबत आदेश जारी केला असून, सोमवारपासून बँका उघडण्याच्या वेळेत बदल करण्यात आला असून, नवीन नियमावलीनुसार सकाळी ९ वाजता देशभरातील बँका उघडणार आहेत. मात्र, बँका बंद करण्याच्या वेळेत कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. रिझर्व्ह बँकेच्या या नव्या आदेशामुळे आजपासून ग्राहकांना बँकेचे कामकाज करून घेण्यासाठी आणखी एक तास अधिकच मिळणार आहे. देशभरात भारतीय स्टेट बँकांसह ७ सरकारी बँकाचा यामध्ये समावेश आहे.
याशिवाय देशातील २० पेक्षा खाजगी बँकांमध्ये आयसीआयसीआय बँक, आयडीबीआय, सिटी युनियन बँक, डीसीबी बँक, धनलक्ष्मी बँक, फेडरल बँक, एचडीएफसी आदी बँकांचा समावेश आहे. या सर्वच बँकांना आता सकाळी १० वाजताऐवजी ९ वाजताच कामकाज सुरू करावे लागणार आहे. याचा बँक ग्राहकांना फायदा होणार आहे.
२०२० मधील कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर, आरबीआयने ७ एप्रिल रोजी बाजाराच्या व्यापाराचे तास बदलले होते. व्यवहाराच्या वेळा सकाळी १० ते दुपारी ३.३० पर्यंत बदलण्यात आल्या, त्यामुळे व्यवहाराचे तास अर्ध्या तासाने कमी करण्यात आले. पण आता कोरोनाची परिस्थिती सामान्य असल्याने, त्यानंतर आता आरबीआयने जुने वेळापत्रक पुन्हा लागू केले आहे. परकीय चलन बाजार आणि सरकारी रोख्यांमधील व्यवहार आता बदललेल्या वेळेनुसार शक्य होणार असल्याचेही आरबीआयने आपल्या अहवालात म्हटले आहे.