तालुक्यात रेशनमधील धान्यासंदर्भात एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. रेशनच्या तांदळामध्ये प्लास्टिकचे तांदूळ आढळल्याच सांगितले जात आहे. निळीक गावातील ग्रामस्थांनी यामुळे मोठा संताप व्यक्त केला आहे. भोस्ते येथील एका रेशन दुकानातून ग्रामस्थांनी हे तांदूळ विकत घेतले होते. गरीब आणि गरजू व्यक्तींना दोन वेळचे जेवण मिळावे यासाठी सरकारमार्फत नागरिकांना मोफत रेशन पुरवले जाते. अशात रेशनमध्ये मिळत आसलेलं धान्य खराब असल्याचं अनेक वेळा समोर आलं आहे. खेड तालुक्यातील निळीक या गावात रेशन दुकानातून खरेदी केलेल्या तांदळाच्या पोत्यात चक्क प्लास्टिकचे तांदूळ आढळले आहेत. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
हनुमान जयंतीच्या पार्श्वभूमीवर गावात उत्सव साजरा केला जातो, तसेच भंडाऱ्याचे देखील आयोजन केले जाते. त्यासाठी निळीक येथील ग्रामस्थांनी भोस्ते गावातील रेशन दुकानातून ५० किलोच्या दोन गोण्या म्हणजे एकून शंभर किलो तांदूळ खरेदी केला. हा तांदूळ निवडत असताना महिलांना प्लास्टीक सदृश्य तांदूळ आढळले आहेत, गावकऱ्यांनी याबाबत संताप व्यक्त केला आहे. काही ठिकाणी धान्यात जास्तीचे खडे आढळले आहेत. तर काही ठिकाणी खूप जास्त प्रमाणात धान्यात किड असल्याचे दिसते.