सिंधुदुर्गातील वैभववाडी तालुक्यातील तिथवली गावात अंत्ययात्रेत सामील झालेल्या ग्रामस्थांवर मधमाशांनी जबर हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडली. अचानक झालेल्या मधमाश्यांच्या हल्ल्यामध्ये अनेक ग्रामस्थ जखमी झाले आहेत. एवढंच नव्हे तर मृतदेहाला देखील मधमाशांनी सोडलं नाही. अखेर कोरोना काळाप्रमाणे पीपीई किट घालून अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली. अधिक वृत्त असे की, तिथवली महंमदवाडी येथील शेतकरी पांडुरंग कृष्णा हरयाण (७०) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. गेले काही महिने ते आजारी होते. त्यांच्या अंत्ययात्रेत ६० ते ७० ग्रामस्थ सामील झाले होते.
अंत्ययात्रा स्मशानभूमीत पोचल्यावर त्या ठिकाणी अंत्यविधी करण्यासाठी सुकी लाकडे जाळून चूड पेटविली गेली. त्यामुळे आजूबाजूला धूर पसरला. बाजूच्या ऐनाच्या झाडावर मधमाशांचे पोळे होते. याची कल्पना ग्रामस्थांना नव्हती. आजूबाजूला धूर पसरल्यामुळे पोळ्यावरील माशा बिथरल्या आणि एकच हाहाकार माजला. मधमाशांनी ग्रामस्थांवर हल्ला केला. त्यात काही ग्रामस्थ जखमी झाले. प्रसंगावधान राखून ग्रामस्थांनी धूम ठोकली. जीव वाचविण्यासाठी सैरा वैरा पळत सुटले. पण संतापलेल्या माशांनी त्यांचा एक किलोमीटर अंतरापर्यंत पाठलाग केला.
पीपीई किट घालून अंत्यसंस्कार – हवालदिल झालेल्या ग्रामस्थांना मृतदेहावर अंत्यसंस्कार कसे करायचे असा प्रश्न पडला. त्यांनी संबंधित आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला. कोविड काळात होणाऱ्या मृत्यूनंतर संबंधितांवर पीपीई कीट घालून अंत्यसंस्कार केले जात होते. त्यातील काही किटस् उंबर्डे आरोग्य – केंद्रात शिल्लक होत्या. त्या वापरा – आणि अंत्यसंस्कार करा असा सल्ला देण्यात आला.
अखेर अंत्यसंस्कार – अडीच तासानंतर उंबर्डे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातून पाच पीपीई किट घटनास्थळी नेण्यात आले. मयत पांडुरंग हरयाण यांच्या मुलाने किट घालून विधी पूर्ण केले. इतर चार ते पाच जणांनी पिपीई कीट घालून स्मशानभूमीत जात त्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले आणि सुटकेचा. निश्वास टाकला. घडलेल्या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. मधमाशांच्या हल्ल्यात अनेकजण किरकोळ जखमी झाले. त्यांनी खाजगी डॉक्टरकडे उपचार घेतले, दैव बलवत्तर होते म्हणून सर्वजण बचावले. त्यांच्या प्रकृतीला कोणताही धोका नाही, अशी माहिती उंबर्डे आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी दिली.
मधमाशा चावल्यावर काय होते ? – मधमाशांनी डंख मारल्यानंतर प्रचंड वेदना होतात. त्या मधमाशीच्या शरीराच्या पाठचा कुसळासारखा काटा तिने तुमच्या त्वचेत घुसविलेला असतो. तो लगेच शरीरातून काढून टाकण्याचा प्रयत्न करावा लागतो. कारण तो विषारी असू शकतो. अनेक डंख मारले असतील तर ताबडतोब रुग्णालयात जाऊन उपचार करा अन्यथा ते धोकादायक ठरू शकते, असं डॉक्टरांनी बोलताना सांगितले.