लोकसभेची रणधुमाळी संपताच कोकणात पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. १३ उमेदवार या निवडणुकीत आपले नशिब आजमावत असून खरी लढत निरंजन डावखरे विरुद्ध काँग्रेसचे रमेश कीर यांच्यात होणार आहे. यावेळी १ लाख २० हजार नवम तदारांची नोंदणी झाल्याने सुशिक्षित मतदार कोणाच्या गळ्यात विजयाची माळ घालणार? हे लवकरच स्पष्ट होणार आहे. कोकण हा शिवसेनेचा (ठाकरे). बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मात्र पदवीधर मतदारसंघात शिवसेनेला अद्यापही यश मिळालेले नाही. मोठी ताकद शिवसेनेची असून देखील कोकण पदवीधर मतदारसंघात विजयाचे निकाल उलट येत असल्याने कोकणातून शिवसेनेने उमेदवार न देणेच पसंत केले आहे.
नुकतीच लोकसभा निवडणूक पार पडली. रायगड असो, रत्नागिरी असो दोन्ही लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचा दारुण पराभव झाला आहे. त्यामुळे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेसला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. कोकण पदवीधर मतदारसंघात २६ जून रोजी मतदान आहे. या मतदार संघात पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग अशा ५ जिल्ह्यांचा समावेश आहे. यंदा मतदारसंघासाठी सुमारे २ लाख २३ हजार २२२ मतदारांची नोंदणी झाली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात २२ हजार ६८१ मतदार आहेत. यावर्षी ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे. गतवेळपेक्षा यावर्षी १ लाख २० हजार अधिक मतदारांची नोंदणी कोकण पदवीधर मतदारसंघात झाली आहे. यावेळी तब्बल १३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून त्यामध्ये रमेश श्रीधर कीर (काँग्रेस), निरंजन वसंत डावखरे (भाजपा), विश्वजीत तुळशीराम खंडारे (भिमसेना), अमोल अनंत पवार, अरुण भिकन भोई, अक्षय महेश म्हात्रे, गोकुळ रामजी पाटील, जयपाल परशुराम पाटील, नागेश किसनराव निमकर, प्रकाश वड्डेड्पेल्ली, मिलिंद सिताराम पाटील, शैलेश अशोक वाघमारे, श्रीकांत सिध्देश्वर कामुर्ती यांचा समावेश आहे.