गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांना विरोधी पक्षनेतेपद मिळू नये यासाठी शिंदे शिवसेनेकडून फिल्डिंग लावल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यात कल्याण मतदारसंघाचे खासदार श्रीकांत शिंदे यांचे मेहुणे विपुल कदम यांच्यावर गुहागर विधानसभा मतदारसंघाची महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे कोकणातील एकमेव आमदार असलेल्या भास्कर जाधवांच्या मतदारसंघात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मोठा डाव टाकून त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. कोकणी माणूस वर्षानुवर्षे बाळासाहेब ठाकरे आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत राहिला आहे; मात्र, गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत कोकणात उद्धव ठाकरेंच्या गडाला सुरूंग लावण्यात महायुती आणि विशेषतः एकनाथ शिंदे आणि त्यांची शिवसेना यशस्वी ठरली होती. याचवेळी रत्नागिरी जिल्ह्यातील माजी आमदार राजन साळवी, संजय कदम यांच्यासारख्या नेत्यांनीही ठाकरेंची साथ सोडल्याने ठाकरेंच्या शिवसेनेची वाताहत झाल्याचे पाहायला मिळत आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून पक्षबांधणी सुरू झाली आहे. त्याचाच भाग म्हणजे शिंदेंकडून संघटनात्मक बदलावर भर दिला गेला आहे. दुसऱ्या पक्षांतील पॉवरफुल नेत्यांना आपल्या शिवसेनेत आणण्यासाठी गळ टाकले जात आहेत. या दरम्यान महाविकास आघाडीकडून भास्कर जाधव यांचे नाव विधानसभेतील विरोधी पक्षनेतेसाठी जाहीर करण्यात आले. जाधवांना विरोधी पक्षनेतेपद दिल्यास त्याचा परिणाम रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीवर होईल, या भीतीने जाधवांच्या विरोधी पक्षनेते पदाला शिवसेनेकडून विरोध झाल्याची चर्चा सुरू आहे.
एकनाथ शिदेंनी कोकणातील ठाकरेसेनेचा आक्रमक चेहरा असलेल्या भास्कर जाधवांच्या गुहागर मतदारसंघात समन्वयक म्हणून थेट खासदार श्रीकांत शिंदेंच्या मेहुण्याचीच नियुक्ती केली आहे. यामुळे आगामी काळात शिंदेंच्या विपुल कदम यांची ताकद वाढवण्यासाठी प्रयत्नशील असल्याची चर्चा आहे. तसेच कदम यांचे नाव विधानसभा निवडणुकीतील उमेदवारीसाठी आघाडीवर होते; मात्र, रामदास कदमांच्या विरोधामुळे ऐनवेळी राजेश बेंडल यांना उमेदवारी मिळाली होती; पण त्यांचा या निवडणुकीत पराभव झाला. त्यामुळे शिंदेंनी कदम यांच्या रूपाने जाधवांविरोधात आपला हुकुमीएक्का बाहेर काढत गुहागरमध्ये मोठा डाव टाकल्याची चर्चा सुरू आहे.