33.2 C
Ratnagiri
Thursday, February 29, 2024

कातकरी कुटुंबीयांसाठी ‘शासन आपल्या दारी’

चिपळूण तालुक्यात वर्षानुवर्षे वास्तव्यास असलेल्या; परंतु अधिकृत...

चिपळुणातील वृद्ध महिलेच्या खुनाला वाचा फुटली

वालोपे येथे झालेल्या वृद्ध महिलेच्या खुनाला अखेर...

किरण सामंतांनी घेतले ना. नारायण राणेंचे आशीर्वाद…

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून भाजपचे जेष्ठ नेते...
HomeKhedवेरळच्या भोंदूबाबाला २० हजारांचा दंड

वेरळच्या भोंदूबाबाला २० हजारांचा दंड

अशोक महाराजाच्या विरोधात खेड येथील न्यायालयात खटला चालवण्यात आला.

अघोरी कृत्य करून आजार दूर होईल, तुला भूतबाधा झाली आहे, असे सांगून पैसे उकळणाऱ्या खेड येथील भोंदूबाबाला येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. एम. चव्हाण यांनी २० हजार रुपये दंड व परिविक्षेची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणी सन २०१६ मध्ये खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अशोक महाराज ऊर्फ अशोक गोवळकर (रा. गोवळकरवाडी, वेरळ ता. खेड, रत्नागिरी) असे शिक्षा झालेल्या भोंदूबाबाचे नाव आहे. खेड तालुक्यातील वेरळ येथे २०१६ मध्ये अशोक महाराज ऊर्फ अशोक गोवळकर याच्याकडे एक महिला आजारी असल्याने गेली होती. त्या वेळी त्याने तंत्रमंत्र वाचून होमहवन केले. या सर्वाला खर्च येईल, असे सांगितल्यानंतर त्या महिलेने त्यांना सर्व खर्च दिला.

तरीही काहीही गुण आला नाही. त्यामुळे संबंधित महिला पैसे परत मागण्यासाठी अशोक महाराज याच्याकडे गेली. यानंतर अशोक याने माझे खूप बॉडीगार्ड असून, तुझा बंदोबस्त करतील, असे म्हणत जीवे मारण्याची धमकी दिली, अशी तक्रार महिलेने खेड पोलिसांत केली होती. पोलिसांनी अशोक महाराजविरोधात भारतीय दंड विधानातील कलम ४२० अंतर्गत आरोपपत्र दाखल केले. कलम ५०६ आणि महाराष्ट्र सरकार महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अघोरी व दुष्कर्मी प्रथा आणि काळी जादू अधिनियम २०१३ अन्वये गुन्हा दाखल केला. अशोक महाराजाच्या विरोधात खेड येथील न्यायालयात खटला चालवण्यात आला. या फौजदारी खटल्याचा निकाल देताना या अघोरी प्रथेचे समूळ उच्चाटन व्हावे, असा प्रोबॅशन बाँड अशोक महाराज याच्याकडून लिहून घेण्यात आला.

यानंतर जर न्यायालयाच्या निदर्शनास या अघोरी प्रकाराची पुनरावृत्ती झाल्याचे आढळून आले तर त्या क्षणी कायद्यात तरतुदीनुसार कठोर शिक्षेस तो पात्र होईल, अशी समज देण्यात आली. या प्रकरणी अशोक महाराजला २० हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. ही रक्कम नुकसान भरपाई म्हणून तक्रारदार महिलेस देण्यात येणार आहे. ती निर्धारित वेळेत कोर्टात जमा न केल्यास पुन्हा कठोर शिक्षेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्याला तुरुंगाबाहेर राहण्याची सशर्त परवानगी देण्यात आली आहे. त्याच्या सुधारण्याच्या आणि चांगल्या वर्तनाच्या अटीवर त्याला मोकळे सोडण्यात येणार आहे. या प्रकरणी सरकारी वकील अॅड. स्मिता कदम, सतीश नाईक यांनी काम पाहिले, तर तपास खेडचे तत्कालीन पोलिस निरीक्षक अशोक जांभळे, अनिल गंभीर यांनी केला होता.

RELATED ARTICLES

Most Popular