थ्रिप्स, तुडतुडा, करपा रोगामुळे जयगडसह परिसरातील आंबा बागायतदारांना मोठा फटका बसला असून आठ दिवसांपुर्वी पडलेल्या पावासामुळे नुकसानीत भर पडली आहे. याबाबत कृषी विभागाकडून सर्व्हेक्षण झालेले नाही. विमा कंपन्यांनीही पाठ फिरवली असल्यामुळे बागायतदारांना मदत कशी मिळणार असा प्रश्न बागायतदारांनी उपस्थित केला आहे. विमा कंपन्यांनी किमान पंचनामे करावेत, असे साकडे जयगड , पंचक्रोशीतील आंबा बागायतदार उमेश रहाटे यांनी पालकमंत्री उदय सामंत यांना घातले आहे.बदलत्या वातावरणाचा परिणाम रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा उत्पादनावर मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे.आठ दिवसांपूर्वी जयगड पंचक्रोशीत सुमारे अर्ध्या तासाहून अधिक काळ म मुसळधार पाऊस झाला. त्यानंतर ढगाळ वातावरण होते. हा पाऊस सायंकाळी पडल्याने त्याचे परिणाम आंब्यावर झाले आहेत.
ऐन हंगामात ही परिस्थिती उद्भवल्यामुळे या पंचक्रोशीतील आंबा बागायतदारांनी तिव्र नाराजी व्यक्त केली. असून कृषी विभागाकडून या कडे दुर्लक्ष केले आहे.बँकेने बागायतदारांकडून विमा उतरवल्याचे पैसे कट करुन घेतले आहेत. मात्र नुकसानाचे पंचनामे अजूनही केलेले नाहीत. कीटकांपासून संरक्षण करण्यासाठी बागयातदारांनी फवारण्या केल्या. उत्पादन वाचविण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले आहेत. त्यामुळे औषधावर मोठ खर्च झाला आहे. फेब्रुवारी आणि मार्चच्या पहिल्या पंधरवड्यात तापमानात प्रचंड वाढ झाली. अति तापमानामुळे छोटी आणि वाटाण्याच्या आकाराएवढी कैरी पिवळी पडली आणि गळून गेली. याम मुळे एप्रिलच्या शेवटी आणि मे महिन्यात येणाऱ्या आंब्याचे पूर्णतः नुकसान झाले आहे. जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात ५० ते ६० टक्केच मोहर आला आहे. तो वाचवण्यासाठी शेतकऱ्याने औषध फवारण्या केल्या आहेत. देवगड, रत्नागिरी, गुहागर, दापोली, बाणकोट येथील समुद्र किनारी परिसर किंवा कातळ भागात २० एप्रिल ते मे महिन्यात निघणारा आंबा अवकाळी पावसामुळे नष्ट झाला आहे.
मजूरी, फवारणी, बागेचे करार आणि बँकांचे लोन तसेच इतर अनेक खर्च झाले आहेत. त्या तुलनेत उत्पन्न कमी प्रमाणात आहे. त्यामुळे आंबा बागायतदार संकटात सापडला असून पालकमंत्र्यांनी याकडे लक्ष द्यावे अशी मागणी निवेदनाद्वारे जयगड येथील बागायतदार उमेश रहाटे यांनी पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्याकडे केली आहे. बँकेने पिक विम्याचे हप्ते बागायतदाराच्या खात्यामधून वळते करुन घेतले आहेत. जर नुकसानाची पंचनामे झाले नाहीत तर त्याचा परतावा मिळणार नाही. याकडे कृषी विभाग आणि संबंधित विमा कंपनी यांनी लक्ष द्यावे अशा सुचना मुख्यमंत्री, कृषिमंत्री आणि पालकमंत्र्यांनी दिल्यास त्याचा लाभ आंबा-काजू बागायतदारांना होईल, असे खंडाळा येथील शेतकरी उमेश रहाटे म्हणाले.