राजापूर, लांजा, साखरपा या विधानसभा मतदारसंघावर महायुतीमधून दावे-प्रतिदावे होत असले तरीही मागील काही वर्षांत पक्षाची वाढलेली ताकद लक्षात घेता हा विधानसभा मतदारसंघ भाजपलाच मिळाला पाहिजे. केवळ मतदारसंघ नव्हे तर उमेदवारही स्थानिकच असला पाहिजे, अशी मागणी भाजपच्या विधानसभा मतदारसंघाच्या क्षेत्रप्रमुख राजश्री विश्वासराव यांनी केली. राजापूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. भाजप युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस स्वप्नील गोठणकर, चंद्रकांत लिंगायत, गांधी उपस्थित होते.
या वेळी विश्वासराव म्हणाल्या, ‘२०१४ नंतर विधानसभा मतदारसंघात भाजपची ताकद वाढली आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत विधानसभा मतदारसंघातून नारायण राणे यांना ५० हजारांहून अधिक मते मिळाली. याशिवाय पक्षाची ताकद देखील वाढली आहे. हा मतदारसंघ भाजपला मिळायला हवा. स्थानिकांकडून पक्षनेतृत्वाकडे मागणीही केली आहे. राजापूर, लांजा, साखरपा या विधानसभा मतदार संघात महायुतीमध्ये उमेदवारीसाठी जरी मोठी स्पर्धा असली तरीही पक्षनेतृत्वाकडून योग्य तो निर्णय घेतला जाईल. गेल्या पंधरा वर्षांत राजापूर विधानसभा मतदारसंघात कोणतीही लक्षवेधी विकासकामे झालेली नाहीत.
शिक्षण, आरोग्य आणि रोजगार यांसारख्या ज्वलंत समस्या आजही मतदारसंघात कायम आहेत. याकडे साऱ्यांचे लक्ष वेधताना विश्वासराव यांनी मतदारसंघातील विविध प्रश्न सोडवण्यास भाजप कटिबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले. केंद्र आणि राज्यामध्ये भाजपच्या नेतृत्वाखाली असलेल्या सत्तेच्या माध्यमातून राजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये विकासकामे केली आहेत. साखरीनाटे येथील बंदराच्या विकासासाठी आणलेल्या कोट्यवधी रुपयांच्या निधीसह धरणांच्या उभारणीसाठी निधी आणल्याचे विश्वासराव यांनी सांगितले.