पाऊस पडल्यानंतर पहिल्या पंधरवड्यातच दोन महिन्यांपूर्वी केलेला रस्त्याच्या डांबरीकरणाची दुरवस्था झाली. आपल्याकडे मोठ्या प्रमाणात पर्जन्यमान होते हे माहीत असूनही अशा चुका होत असतील तर हे दुर्दैव आहे. मुख्याधिकाऱ्यांचा कोणताच धाक राहिलेला नाही. निकृष्ट रस्ते करणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाका आणि तत्काळ रस्ते दुरुस्त करा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा मनसेच्या मुख्याधिकाऱ्यांना दिला. पदाधिकाऱ्यांनी शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत रत्नागिरी मनसे पदाधिकाऱ्यांनी पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांची भेट घेत याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.
या वेळी मनसे शहराध्यक्ष अद्वैत कुलकर्णी, विभाग अध्यक्ष दिलीप नागवेकर, विभाग अध्यक्ष सर्वेश जाधव, शाखाध्यक्ष मार्विक नारकर, मनसे रस्ते आस्थापना तालुका संघटक सतीश खामकर, माजी तालुकाध्यक्ष सचिन शिंदे आदी पदाधिकारी, महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते. शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत ओरड झाल्यानंतर काँक्रिटीकरण करण्यात येणाऱ्या रस्त्यांचे सुरवातीला डांबरीकरण करण्यात आले. दोन ते तीन महिन्यांपूर्वीच हे डांबरीकरण झाले. पहिल्या पावसातच हे डांबरीकरण वाहून जाऊन रस्त्यांची चाळण झाली आहे.
अतिशय निकृष्ट दर्जाची कामे सुरू आहेत. जनतेचा पैसा काही लोकं वाया घालवत आहेत. याबाबत नागरिकांच्या अनेक तक्रारीही येत आहेत. त्यामुळे अशा ठेकेदारांना काळ्या यादीत टाका, अशी मागणी केली. तसचे खराब रस्त्यांची तत्काळ दुरुस्ती करा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. गॅस पाईप टाकण्यासाठी खोदण्यात आलेल्या रस्त्यांची दुरुस्ती ही तत्काळ होत नाही. पाऊस पडल्यावर सर्व माती रस्त्यावर येऊन नागरिकांना सहन कराव्या लागणाऱ्या त्रासालाही मनसे पदाधिकाऱ्यांनी आज वाचा फोडली.