समुद्रात जयगड- हर्णे दरम्यान एक मासेमारी नौका उलटल्याते झालेल्या अपघातात बोटीवरील ५ खलाशांनी खवळलेल्या समुद्राशी १२ तास झुंज देत आपले प्राण वाचविले. या जीवन-मृत्यूच्या संघर्षात अनेक अडथळे आले मात्र त्यांनी हिंमत हारली नाही आणि अखेर मृत्यूवर मात करत किनारा गाठलाच. या पाचहीं खलाशांच्या जिद्दीचे कौतुक करावे तितके थोडे आहे, अशा प्रतिक्रिया अनेक मच्छिमारांनी व्यक्त केल्या आहेत. हा अपघात मागील वर्षी २४ डिसेंबर २०२३ ला झाला. त्याविषयीची माहिती विलंबाने उघड झाली. या जिद्दी खलाशांनी दिलेल्या माहितीनुसार, हर्णे येथील एक बोट २४ डिसेंबरला खोल समुद्रात मासेमारी करीत होती.
मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास एक मालवाहू, पॅसेंजर बोट त्यांच्यासम ोरून गेली आणि व्यामुळे अचानक जोराच्या लाटा उसळल्या, या लाटांमुळे मासेमारी करणारी नौका उलटली. इंजिनमध्ये पाणी गेले आणि त्या नौकेत बिघाड झाला. नौकेतील खलाशांसमोर मोठे संकट उभे राहिले. या नौकेवर नरेश रामचंद्र चौगुले, त्यांचा मुलगा पराग चौगुले, दीपक महसला (वाशी रायगड), वैभव गजानन चौगुले आणि दिलीप (वाशी रायगड) असे पाचजण होते. या संकटात सापडताच नरेश चौगुले यांनी आपल्या सहकाऱ्यांना मोठा दिलासा दिला.
स्वतः लढताना सहकाऱ्यांनाही लढण्याची प्रेरणा दिली. हातामध्ये जी गोष्ट मिळेल त्याचा आधार घेत मार्ग काढण्यात आला. बुडत्याला काडीचा आधार अशी एक म्हण आहे. त्यानुसार मिळेल त्याचा आधार घेत हे पाचही खलाशी पाण्यात तरंगत राहिले. सकाळी ६ वाजता नरेश चौगुले यांनी बाकी सर्वांना तेथेच थांबविले आणि स्वतः पोहत मदतीसाठी निघाले. दुपारी पाऊण वाजण्याच्या दरम्यान त्यांना गोव्याच्या सीमेवर एक नौका त्यांना दिसली. त्या नौकेपर्यंत जाऊन त्यांना ही घटना सांगितली. यानंतर या गोव्यातील बोटीवरील लोकांनी त्यांना मदत केली.
नरेश चौगुले यांना घेवून त्यांचे अन्य सहकारी ज्याठिकाणी अडकले होते तेथे त्यांनी नौका आणली आणि सर्वांची सूटका केली. नरेश चौगुले यांनी आपल्या भावांना पाजपंढरी गावात फोन केला. तेथून हर्णे बंदरात फोन गेला व हर्णे बंदरातून दोन फायबर बोटी या खलाशांना परत आणण्यासाठी गेल्या. परतल्यानंतर सर्वांवर प्राथमिक उपचार करण्यात आले. नरेश चौगुले यांनी केलेल्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.