रत्नागिरी शहराजवळील भाट्ये खाडीत बोट पलटी झाल्याची घटना गुरुवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घडली. बुडालेली नौका नव्यानेच तयार करण्यात आली होती. या नव्या बोटीची चाचणी सुरू असताना ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत सहा खलाशांना वाचविण्यात यश आले आहे. अन्य बोटीनी या अपघात झालेल्या बोटीभवती रिंगण करुन अडकलेल्या खलाशाना सुखरुपपणे त्या बोटी बाहेर काढले. मिळालेल्या माहितीनुसार भाट्ये येथील खाडीच्या मुखातून बोट समुद्रात नेण्यात येत होती. यावेळी खाडीच्या पाण्याचा करंट बसल्याने बोट खाडीत पलटी झाली. बोट पलटी होताच बोटीतील खलाशांनी खाडीत उड्या घेतल्या.
सुरुवातीला खलाशी बचावासाठी उलट्या झालेल्या बोटीवर चढले. या परिसरात मच्छीमारी करणाऱ्या इतर मच्छीम ारांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी या खलाशांच्या बचावासाठी धाव घेतली. सुरक्षेसाठी व लाटांचा मारा कमी करण्यासाठी बुडालेल्या बोटीच्या सभोवताली इतर बोटिंच्या मदतीने रिंगण करण्यात आले. प्रथम खलाशांना सुखरूप दुसऱ्या बोटीवर घेण्यात आले. यानंतर बुडालेली नौका राजिवडा खाडी येथे आणण्यात आली. या बोटीवर एकूण ६ खलाशी होते. ही बोट सज्जाद साखरकर यांची असल्याची माहिती स्थानिक ग्रामस्थांनी दिली. या दुर्घटनेत जांळ्याचे सुमारे २ लाख रु चे नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे.