कोकण पट्ट्यामध्ये लाचलुचपत प्रतिबंध विभाग लाचखोरीला प्रतिबंध घालण्यासाठी अनेक उपाययोजना करत आहे. वारंवार आवाहन करत असले तरी लाचखोरी मात्र कमी होताना दिसत नाही. एखाद्याचे काम लवकरात लवकर होण्यासाठी किंवा कायद्याच्या चाकोरीत बसवण्यासाठी लाच देण्याचा आणि घेण्याचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. म्हणून शासकीय कारभारामध्ये लाच हे प्रकरण काही नवीन नाही.
कारण, पैसे दिल्याशिवाय कागद पुढे सरकतच नाही, अशी अनेक उदाहरणे समोर आली आहेत. त्यासाठी शासनाचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी सतत कार्यरत आहेत; परंतु लाचखोरीचे प्रकरण काही थांबण्याचे नाव घेत नाही. लाचखोरीला प्रतिबंध घालण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. असे आवाहन सुशांत चव्हाण, उपअधीक्षक लाचलुचपत प्रतिबंध विभाग, रत्नागिरी यांनी पदभार स्वीकारतानाच केले आहे.
कोकण विभागात एकूण ६ जिल्ह्यांचा समावेश आहे. त्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा सर्वांत कमी लाचखोरीची प्रकरणे झालेला जिल्हा आहे. रत्नागिरी जिल्ह्याचे चित्र मात्र वेगळे दिसत आहे. गेल्या वर्षी रत्नागिरी जिल्ह्यात लाचखोरीची ३ प्रकरणे घडली होती; मात्र यावर्षी त्यामध्ये वाढ होऊन ६ लाचखोरांना पकडण्यात यश आले आहे. सर्वांत जास्त लाचखोरांमध्ये ठाणे जिल्ह्याचे नाव पहिल्या क्रमांकावर आहे. गेल्या वर्षी ठाण्यात ४० लाचखोरांचा पर्दाफाश करण्यात आला होता, तर यंदा ३९ लाचखोरांचा समावेश आहे. त्यानंतर पालघर जिल्ह्यात गतवर्षी १४ तर यंदा १५ प्रकरणे झाली आहेत.
जिल्ह्यात सरत्या वर्षभरात लाचखोरीचे प्रमाण अत्यल्प असले तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दुप्पट लाचखोरीची प्रकरणे उघड झाली आहेत. १ जानेवारी ते डिसेंबर २०२२ पर्यंत जिल्ह्यात लाचखोरीची ६ प्रकरणे उघडकीस आली तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वात कमी ३ प्रकरणे उघडकीस आली. कोकण विभागात वर्षभरात एकूण ८४ प्रकरणात लाचखोरांवार कारवाई करण्यात येऊन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला यश आले आहे. कोकणात सर्वाधिक ठाणे जिल्ह्यात लाच घेतल्याची प्रकरणे उघडकीस आली आहेत.