कोदवली- अर्जुना नदीला आलेल्या भरती येऊन घुसलेल्या पाण्याचा कोदवली नदीच्या खलीं पात्रामध्ये पार्किंग करून ठेवलेल्या गाड्यांना वेढा पडला आहे. भरदुपारी आलेल्या भरतीचे पाणी वाढतच चालल्याने त्याच्यातून पार्किंग केलेल्या गाड्या बाहेर काढणे मुश्कील झाल्याने आणि वाढत्या पाण्यामध्ये गाड्या वाहून जाण्याचा धोका असल्याने अनेक वाहनचालक आणि मालकांचा जीव टांगणीला लागला आहे. गेल्या दोन दिवसांपासून समुद्राला उधाण येण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
तसेच अमावस्येमुळे भरतीचे पाणी वाढल्याने कोदवली नदीचे खर्ली पात्र आणि अर्जुना नदीपात्रातील बंदर धक्का पाण्याने भरून गेला. भरतीच्या पाण्यात दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. या वाढणारे भरतीचे पाणी आणि अन्यवेळी कोरडे असणारे पात्र भरतीच्या पाण्याने भरून गेले. या पाण्यामुळे राजापूरवासीयांना पूरस्थितीची आठवण झाली. शहरामध्ये गाड्यांच्या पार्किंगसाठी फारशी मोकळी जागा नाही. त्यामुळे शहरामध्ये वाहतूककोंडी होते. त्यामुळे अनेक वाहनचालकांकडून कोदवली नदीतील मोकळ्या खर्लीपात्रामध्ये गाड्या लावल्या जातात.
त्याप्रमाणे अनेकांनी नेहमीप्रमाणे आजही खर्ली नदीपात्रात गाड्या पार्किंग करून ठेवल्या होत्या; मात्र भरतीचे पाणी वाढल्याने पार्किंग केलेल्या गाड्यांना पाण्याचा वेढा पडला. भरतीचे पाणी एवढ्या वेगाने आले की, वाहनचालक वा मालकांना कोणताही अंदाज येण्यापूर्वीच गाड्या पाण्यात बुडाल्या. भरतीच्या पाण्याने नदीपात्र एवढे भरून गेले की, पात्रामध्ये उतरून पाण्यामध्ये अडकलेल्या गाड्या बाहेर काढणेही मुश्कील झाले. त्यामुळे अनेक वाहनचालक आणि मालकांचा जीव टांगणीला लागला.