सातत्याने बदलणारे हवामान आणि तापमान, अवकाळी पाऊस आदी नैसर्गिक संकटांमध्ये अडकलेल्या आणि कोकणचं पांढरं सोनं म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काजू पिकाला आता थ्रीप्स किडीच्या प्रादुर्भावाच्या नव्या संकटाने घेरलं आहे. थ्रीप्स कीडीच्या अनेक जाती असून यापूर्वी आंबा, मिरची, तंबाखू यांसह फुलशेतीवर आढळून येणारी श्रीप्स आता काजूपिकावरही आढळून येऊ लागला आहे. याला काजू अभ्यासक डॉ. शैलेश शिंदेदेसाई यांनी पुष्टी दिली असून, काजूच्या अर्थकारणावर परिणामकारक ठरणाऱ्या या श्रीप्सच्या नव्या जातीसह त्याला अटकाव करणाऱ्या उपायोजनांसोबत काजूची नवी जात निर्मितीबाबत सखोल संशोधनाची आवश्यकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. जगभरातून मोठ्या प्रमाणात मागणी असलेल्या कोकणातील हापूस आंब्याला गेल्या काही वर्षामध्ये थ्रीप्सच्या प्रादुर्भावाने घेरले आहे. आतापर्यंत काजू पिकावर फारसा प्रादुर्भाव दिसंत नव्हता; मात्र, थ्रीप्सने काजू पिकाकडेही आपला मोर्चा वळवला आहे. त्यामुळे खर्च आणि उत्पन्नाचा ताळमेळ बसवणे मुश्किल होऊ लागल्याने काजू बागायतदार पुरते हवालदिल झाले आहेत.
गेल्या काही वर्षामध्ये कोकणामध्ये तापमानामध्ये सातत्याने बदल दिसत आहेत. त्यामध्ये दिवसा ३८ अंश ते ४० अंशापर्यंत वाढत जाणारे तापमान रात्री १७ ते २० अंशापर्यंत खाली उतरत आहे. सातत्याने तापमानामध्ये होणारे हे बदल काजू पिकासाठी हानीकारक ठरत आहेत. त्याच्या जोडीला रात्री पडणारे दव, सातत्याने पडणारे धुके यामुळे काजू पिकावर नवनवीन किडींचा प्रादुर्भाव वाढत चालल्याची माहिती डॉ. शिंदेदेसाई यांनी दिली. श्रीप्सचा प्रादुर्भाव आणि होणाऱ्या नुकसानीबाबत त्यांनी दैनंदिन निरीक्षण, शेतकऱ्यांशी संवाद आणि अभ्यासाअंती काही नोंदी केल्या आहेत. मोठ्या फळांवरील हिरवा रंग किडी खरवडून खात असल्यामुळे काजूची वाढ थांबते. परिणामी, फळे लहान राहण्याबरोबर आतील गराची वाढ होत नाही. त्यातून, बीचे वजन घटते. काजू बी सोबत काजू बोंडावरसुद्धा थ्रीप्स हल्ला करतात. त्यातील, रस शोषून घेत असल्याने बोंडाची वाढ होत नाही. फळे तडकतात. बोंडू कच्ची असतानाच अकाली पिकतात. त्याचा प्रतिकूल परिणाम होऊन काजू बीचे वजन आणि आकारासोबत एकंदरीत, काजूचे उत्पादनही घटत असल्याची माहिती डॉ. शिंदेदेसाई यांनी दिली.
धुके, दमट हवामान वाढीसाठी पोषक – थ्रीप्स ही कीड अतिसूक्ष्म असून, उघड्या डोळ्यांनी सहज दिसत नसून धुके व दमट वातावरण वाढीसाठी पोषक ठरते. असंख्य सूक्ष्म पिल्ले या कीटकांना होत असून, ही पिल्ले काजूच्या फुलांचे भाग (कुक्षी, कुक्षीकृत, अंडाशय, परागकण) खात असल्यामुळे परागीकरण होऊन फळ तयार होण्याची प्रक्रियाच रोखली जाते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर फुले येऊनही फळधारणेमध्ये अडथळे येतात. त्यानंतरही फळधारणा झाल्यास लाल रंगाच्या कोवळ्या फळांचा रस शोषून घेतला जाऊन ती फळे काळी पडून सुकंतात.