दागिने पॉलिश करून देण्यांच्या बहाण्याने खेड येथील महिलेकडील सुमारे ४ लाख ८० हजाराचे दागिने लांबवणाऱ्या चोरट्यास पोलिसांनी रविवारी नाशिक येथून ताब्यात घेतले आहे. या चोरट्यासह त्याचे चौघे साथिदार जेरबंद झाल्याने सोने चांदी पॉलिश करून फसवणूक करणारी आंतरराज्य टोळीच्या मुसक्या वळण्यास पोलिसांना यश आले आहे. दागिने पॉलिश फसवणुकीतील राज्यभरातील अनेक गुन्हे यामुळे उघडकीस होतील, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात ही चोरीची घटना दि. ८ जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास खेड येथे घडली होती. दि. ८ रोजी दुपारच्या सुमारास खेड येथील एक ज्येष्ठ नागरिक महिला आपल्या राहत्या घरातील अंगणात उभ्या होत्या.
त्यावेळी एक अनोळखी इसम त्यांच्या घराच्या दरवाज्यावर येवून म्हणाला की, तुम्हाला सोने चांदी पॉलिश कारायची आहे का? मी तुम्हाला ते करून देतो, माझ्याकडे एक पावडर आहे. ती महिला सोने चांदी पॉलिश करून घेण्यास तयार नव्हती. परंतु इसमाने अधिक जोर देऊन घरातील इतर चांदीच्या वस्तु असल्यास त्या पॉलिश करून देतो असे सांगितले. महिलेने आपल्याकडील एक चांदीची वाटी पॉलिश करण्याकरीता दिली. त्यानंतर त्या इसमाने या ज्येष्ठ नागरिक महिलेच्या हातामध्ये कोणते तरी पांढऱ्या रंगाचे खडे दिले आणि त्याचा वास त्यांना घेण्यास सांगून घरातून हळद आण्याकरीता सांगितले. पांढरे खडे व हळद याचे एक मिश्रण तयार केले. त्यांच्या हातामधील सोन्याच्या बांगड्या व पाटल्या मागितल्या.
हे दागिने मिश्रणात टाकून या ज्येष्ठ नागरिक महिलेच्या नाव गावाबाबत विचारणा केली. या दरम्यान दूसरा एक अनोळखी इसम घरात आला व त्याने उजाला पावडर नावाची सोने- चांदी व पितळी भांडी पॉलिश करून देण्याची कंपनी असल्याचे सांगितले व लागलीच तो तेथून निघून गेला. थोड्या वेळाने या इसमाने त्यांना घरातून पाणी आणण्यास सांगितले व परातून पाणी आणेपर्यंत सदर अनोळखी इसम हा तेथून ४ लाख ८० हजार रुपये किमतीच्या ४ सोन्याच्या बांगड्या व २ सोन्याच्या पाटल्या घेऊन पळून गेला.
फसवणूक झालेल्या या ज्येष्ठ नागरिक महिलेने खेड पोलीस स्थानकात धाव घेऊन तक्रार दाखल केली. फिर्यादी वरून खेड पोलीस ठाण्यात भादंविक ४०६, ४२० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस अधीक्षक रत्नागिरी यांच्या मार्गदर्शनाखाली खेड पोलीस ठाणे येथील प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक नितीन भोयर हे आपल्या पथकासह या गुन्ह्याचा तपास करत होते. पो. नि. नितीन भोयर यांच्या पथकाला काही संशयित मनमाड तालुका नांदगाव, जिल्हा नाशिक परिसरात असल्याचे समजले. त्यानुसार ताबडतोब हे पथक नाशिकमध्ये दाखल झाले.
याठिकाणी दि. २१ जानेवारी रोजी मोहंमद सुबेर इम्रान शेख, (वय २८), साजिद लाडू साह, (वय २४), मोहंमद आबिद इल्यास शेख, (वय २९) महमद जुबेर फती आलम शेख, (वय ३२) (सर्व राहणार तुळसिपुर जमुनिया जिल्हा भागलपूर, राज्य बिहार) तसेच नंदकुमार श्रीरंग माने (वय ५० रा. मनमाड शिवाजी चौक तालुका नांदगाव, जिल्हा नाशिक) यांना ताब्यात घेतले. आतापर्यंत झालेल्या तपासामध्ये या सोने पॉलिश फसवणूक करणाऱ्या टोळीने महाराष्ट्रातील ८ जिल्ह्यात एकूण २१ महिलांची अशाप्रकारे सोने चांदी पॉलिश करून देतो सांगून फसवणूक केल्याचे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे. ज्यामध्ये प्रामुख्याने नाशिक, पुणे, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, अहमदनगर, जालना व संभाजी नगर या जिल्ह्यांचा समार्यश आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.