दूध व्यवसायासाठी गुजरात येथून म्हशी देतो असे आमिष दाखवून २ लाख ६३ हजारांची फसवणुकीचा प्रकार पुढे आला आहे. या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिस आदमभाई घांची ऊर्फ आबू व अमितभाई आदमभाई घांची (दोघेही रा. धराद, गुजरात) अशी संशयितांची नावे आहेत. ही घटना २८ ते २९ फेब्रुवारीला सायंकाळी साडेसातच्या सुमारास वेतोशी येथे घडली. जगदीश कृष्णा झोरे (वय २९, रा. वेतोशी, धनगरवाडी, रत्नागिरी) हे दुध व्यावसायिक असून ते वेतोशी येथे म्हशी पाळून दुध विक्री करतात. त्यांना मुरा जातीच्या म्हशींची व्यवसायाकरिता गरज होती.
त्यामुळे त्यांचा मित्राने गुजरात राज्यातून मुरा जातीच्या म्हशी खरेदी केलेल्या असल्याने त्यांचे व फिर्यादी यांचे ओळखीचे संशयित आबु व अमित भाई यांच्याशी त्यांनी मोबाईलवरुन संपर्क करुन दिला. त्याना मुरा जातीच्या म्हशी पाहिजेत असे कळविले. त्यांनी म्हशीचे फोटो व व्हिडिओ पाठविल्यानंतर जगदीश झोरे यांनी त्यापैकी सहा म्हशी पसंत करुन म्हशींची किंमत ठरवून संशयित अमितभाई यांना ऑनलाईन ९८ हजार रुपये पाठविले. त्यानंतर १ लाख ६५ हजार बँकेतून असे एकूण २ लाख ६३ हजार रुपये संशयितांना पाठविले. संशयितांनी म्हशी दोन दिवसात पाठवतो असे सांगून फसवणूक केली. या प्रकरणी जगदीश झोरे यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास ग्रामीण पोलिस अमंलदार करत आहेत.