चिपळूणमधील काँग्रेसच्या नगरसेवकांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे. भेट घेतल्याचे जरी सत्य असले तरी, ते फक्त आणि फक्त चिपळूण शहरातील समस्या आणि विकासकामांबाबत भेटले आणि चर्चा केली. त्याचा अर्थ त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला असा होत नाही.
राज्याचे मुख्यमंत्री हे कोणत्या एका पक्षाचे नसतात. त्यामुळे त्यांना भेटणे म्हणजे पक्षांतर असे होत नाही. काँग्रेस नगरसेवकांनी घेतलेली मुख्यमंत्र्यांची भेट ही शहरातील समस्या व विकासासाठी होती. त्याचा वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही. ते सर्वजण काँग्रेसचे निष्ठावंत आहेत. ते कुठेही जाणार नाहीत. ते काँग्रेसचे होते आणि काँग्रेसचेच राहतील, अशा स्पष्ट शब्दात चिपळूण काँग्रेसचे शहराध्यक्ष लियाकत शहा यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे.
राजकीय भूकंप वगैरे असले काही काँग्रेसमध्ये नसते. चिपळूणमधील काँग्रेस मजबूत आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांनी गच्च भरलेली पक्ष संघटना आहे. त्यामुळे सुतावरून स्वर्ग गाठण्याचा प्रयत्न कोणीही करू नये. आमचे कार्यकर्ते खोके आणि पेटीला भुलणारे नाहीत, असेही शहराध्यक्ष शहा यांनी स्पष्ट केले आहे.
येथील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी उपनगराध्यक्ष सुधीर शिंदे, माजी नगरसेवक करामत मिठागरी, हारून घारे, संजीवनी शिगवण यांनी सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबई येथे भेट घेतली. प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक नासिर खोत यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या भेटीत प्रदीर्घ चर्चादेखील झाली. साहजिकच या भेटीने राजकीय चर्चांना उधाण आले. मात्र ही भेट फक्त शहरातील विकासकामांसंदर्भात होती, असे त्या नगरसेवकांनीच स्पष्ट केले.
आता काँग्रेसचे शहराध्यक्ष लियाकत शहा यांनीदेखील उघडपणे प्रतिक्रिया देत या भेटीबाबत भूमिका स्पष्ट केली. मुख्यमंत्र्यांना राज्यातील कोणताही सामान्य माणूस भेटू शकतो. ते राज्याचे पालक आहेत. मुख्यमंत्री हे कोणत्या एका पक्षाचे नसतात तर ते राज्याचे मुख्यमंत्री असतात. त्यामुळे कोणत्याही समस्येबाबत त्यांना भेटणे अजिबात गैर नाही, असेही त्यांनी नमूद केले आहे.