पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे चिपळूण शहरात पूरपरिस्थिती उद्भवू नये यासाठी पालिका प्रशासन अॅक्शन मोडवर आली आहे. पावसाळ्यापूर्वी आपत्तीविषयक कामे निश्चित करून ती मार्गी लावली जात आहेत. नालेसफाईबरोबरच राष्ट्रीय महामार्गावरील गटारांच्या स्वच्छतेकडेही विशेष लक्ष दिले जात आहे. त्यामुळे पाणी तुंबून शहरवासीयांना त्रास होणार नाही या दृष्टीने पालिका प्रशासनाने नियोजन केले आहे. तसेच, कायमस्वरूपी उपाययोजनांसाठी शहरातील मोठे नाले व वहाळांचे काँक्रिटीकरण केले जाणार आहे. प्रांताधिकारी आकाश लिगाडे, मुख्याधिकारी विशाल भोसले, तहसीलदार प्रवीण लोकरे आदींनी पावसाळ्यापूर्वी दोन महिने आधी आपत्ती व्यवस्थापन बैठक घेतली. त्यामध्ये नागरिकांशी संवाद साधला गेला. त्यांनी केलेल्या सूचनेनुसार शहर स्वच्छतेचे नियोजन करण्यात आले.
शहरातील १५ ठिकाणे निश्चित करून तेथे तीन टप्प्यात कामे केली जाणार आहेत. चार ठिकाणी स्वच्छतागृहे उभारण्याचे काम सुरू केले आहे. शहरातील नाले, वहाळ, गटारांची स्वच्छता मोहीम हाती घेतलेली आहे. पावसाळ्यापूर्वी शहरातील ५२ नाल्यांची सफाई करण्यासाठी १९ पथके तैनात केली आहेत. त्यामुळे काम वेगाने सुरू झालेले आहे. नालेसफाईवेळी जिथे जेसीबी पोहोचत नाहीत तेथे कामगारांकडून सफाई करवून घेतली जात आहे. प्रांत कार्यालयासमोरील जागेचे सपाटीकरण केले असून, तिथे नागरिकांची वाहने उभी केली जाणार आहेत. शहराबरोबरच गावस्तरावर आपत्ती व्यवस्थापनासाठी प्रांताधिकारी लिगाडे यांनी बैठका घेतल्या आहेत.
नाले, वहाळ काँक्रिटीकरणाचा प्रस्ताव – पावसाळ्यापूर्वी शहरातील आपत्तीशी निगडित कामे मार्गी लागतील, असे प्रयत्न सुरू आहेत. शहरातील नालेसफाईची कामे सुरू केली आहेत. शहरातील मोठे नाले, असून त्यासाठी ४० कोटींचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे. त्यालाही मंजुरी मिळेल, अशी अपेक्षा आहे. मोठ्या नाल्यांचे काँक्रिटीकरण केल्यामुळे त्यावर अतिक्रमण होणार नाही शिवाय पावसाचे पाणी गतीने वाहून जाईल. पुरावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी नदीकिनारी १९ ठिकाणी संरक्षण भिंती उभारण्याचे नियोजन आहे. त्यासाठी १०६ कोटींचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे. त्याचबरोबर शहरवासीयांना पावसाळ्यात पाणी तुंबून होणारा त्रास सहन करावा लागणार नाही. त्यासाठी आम्ही दक्षता घेत आहोत, असे मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी सांगितले.