स्वच्छता ही सेवाअंतर्गत भाट्ये समुद्र किनाऱ्याची आज स्वच्छता करण्यात आली. ‘मी घाण करणार नाही आणि इतरांनाही घाण करू देणार नाही, ही शपथ सर्वांनी पाळावी. परिसर स्वच्छतेत सातत्य ठेवा’, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी कीतींकिरण पुजार यांनी केले. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, उपप्रादेशिक कार्यालय, जिल्हा परिषद, नगरपालिका, महसूल विभाग, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, पंचायत समिती, ग्रामपंचायत भाट्ये, फिनोलेक्स, जेएसडब्ल्यू आणि अल्ट्राटेक सिमेंट आदींच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम राबवण्यात आली.
या वेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई, एमपीसीबीचे उपप्रादेशिक अधिकारी प्रमोद माने, गटविकास अधिकारी जे. पी. जाधव, मुख्याधिकारी तुषार बाबर आदी उपस्थित होते. पुजार म्हणाले, स्वच्छता ही सेवा या मोहिमेंतर्गत सागरी किनाऱ्यांची स्वच्छता होत आहे. यामध्ये सातत्य राहिले पाहिजे. परिसर मी घाण करणार नाही आणि इतरांनाही घाण करू देणार नाही, या प्रतिज्ञेप्रमाणे सर्वांनी नियमित स्वच्छता ठेवावी.
सागरकिनारे ही आपली प्रमुख पर्यटनस्थळे आहेत. ती स्वच्छ ठेवणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. या प्रसंगी स्वच्छता ही सेवा २०२४, स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता या लोगोचे प्रकाशन करण्यात आले. स्वच्छता संदेश देऊन फलकावर स्वाक्षरीही करण्यात आली. गटविकास अधिकारी जाधव यांनी सर्वांना स्वच्छतेची प्रतिज्ञा दिली. यानंतर भाट्ये समुद्र किनारा उपस्थितांनी श्रमदानांनी स्वच्छ केला. त्याचबरोबर १० नारळ झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. १०० मीटर धावण्याच्या स्पर्धा घेऊन उत्तम आरोग्याचा संदेशही देण्यात आला. विजेत्यांना दालचिनी आणि नारळाचे रोप देऊन गौरवण्यात आले.