महामार्गावर नवीन वाहनचालकांना प्रवास करताना मदत व्हावी, या उद्देशाने ठिकठिकाणी फलक लावले जातात. यामध्ये अंतर, दिशा, वळणेबाबत मार्गदर्शन केलेले असते. त्याची वाहनचालकांना मदत व्हावी, हा उद्देश असतो; पण मुंबई-गोवा महामार्गावरील एक फलक वाहनचालकांची दिशाभूल करणारा ठरत आहे. हातखंबा येथून संगमेश्वर येथे जाताना बावनदी बसथांब्यानजीक असलेला हा फलक चुकीची दिशा दर्शवत आहे. बावनदी बसथांब्याच्या अलीकडे हा फलक बसवण्यात आला आहे. या फलकावरून देवरूखला जाणारी दिशा डावीकडे दिसत आहे. प्रत्यक्षात मात्र पूल ओलांडल्यावर देवरूख येथे जाण्यासाठी उजवीकडे वळण घ्यावे लागते. हा फलक परस्परविरुद्ध दिशा दर्शवत असल्यामुळे नव्याने प्रवास करणाऱ्या वाहनचालकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे.
त्यामुळे त्यांना निश्चितस्थळी पोहोचण्यासाठी हेलपाटे मारावे लागत आहेत. त्यामुळे वेळेचा अपव्यय होऊन इंधनाचेही नुकसान होत आहे. त्यामुळे वाहनचालक व पर्यटकांतून नाराजी व्यक्त होत आहे. संबंधित दिशादर्शक फलकावर प्रशासनाकडून योग्य ती दुरुस्ती करून वाहनचालकांचा संभ्रम दूर करावा, अशी मागणी होत आहे.
चिपळुणातही होते चुकीचे फलक – मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूण भागातही यापूर्वी असेच विरुद्ध दिशा दाखवणारे फलक लावण्यात आले होते. याबाबत ग्रामस्थांसह वाहनचालकांनीही नाराजी व्यक्त केली होती. काही महिन्यांनंतर हे फलक काढून त्या ठिकाणी व्यवस्थित दिशा दाखवणारे फलक लावण्यात आले होते. त्यानुसार महामार्गावर बसविण्यात आलेल्या दिशादर्शक फलकावरील संभ्रम वेळीच दूर करावा, अशी मागणी वाहनधारकांच्यातून होत आहे.