गेल्या काही दिवसांपासून मुंबई, ठाणे, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला होता. त्यानुसार बुधवारी (ता. २६) कमाल तापमान ३७.२ अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले आहे. सलग तिसऱ्या दिवशी ३७ अंशावर तापमान राहिले आहे. उन्हाच्या झळांनी रत्नागिरीकर चांगलेच त्रस्त झालेले होते. दुपारच्या सुमारास नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. मुंबईमध्ये उन्हाचा दाह चांगलाच जाणवू लागला आहे. मुंबईतील तापमानाचा पारा आणखी चढण्याची शक्यता आहे. मुंबईसह कोकण पट्टयातही उन्हाळ्याच्या झळा बसत आहेत. हवामान विभागाकडून मिळालेल्या नोंदीनुसार रत्नागिरीत २४ फेब्रुवारी रोजी तापमान ३८.९ अंशावर होते. २५ रोजीही ३७.० अंशावर पारा होता. २६ रोजी ३७.२ अंश तापमानाची नोंद झालेली आहे. कमाल तापमान वाढलेले असल्यामुळे त्याची झळ नागरिकांना बसलेली आहे.
महाशिवरात्रीची सुटी असल्यामुळे रत्नागिरी शहरातील रस्त्यांवर दुपारच्या सुमारास गर्दी कमी होती. थंड पेयाच्या स्टॉलकडे नागरिकांची पावले वळत होती. तसेच कलिंगड खरेदीकडे अनेकांचा कल होता. हा प्रभाव अजून उद्यापर्यंत राहील असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. उन्हाचा कडाका सुरू असला तरीही अजून शिक्षण विभागाकडून प्राथमिक शाळांच्या वेळेत बदल केलेला नाही. प्रखर ऊन असेल तर उन्हाचा त्रास होऊ नये, यासाठी मुलांची शाळा सकाळच्या सत्रात भरविली जाते. आज सकाळी हवेत गारवा जाणवत होता, दुपारी कडकडीत उन होते. त्याचा परिणाम हापूसवर होत आहे. आंब्याची कलमे सुरक्षित ठेवण्यासाठी बागायतदारांना कसरत करावी लागत आहे. यंदा उत्पादन कमी येण्याची शक्यता असल्यामुळे झाडांवर असलेला मोहोर जपण्याचा प्रयत्न होत आहे.