कोरोनाच्या काळामध्ये शासन ज्या प्रमाणे शक्य होईल त्याप्रमाणे विविध सोई सुविधा पुरवत आहे. रत्नागिरी सिंधुदुर्गसह इतर १५ जिल्ह्यांमध्ये जिथे लॉकडाऊन असूनसुद्धा कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये घट होताना दिसून येत नाही आहे, अशा जिल्ह्यांमधील होम आयसोलेशन हा पर्याय शासनाने बंद करण्यात आल्याचे जाहीर केले आहे. होम आयसोलेट असणारे रुग्ण आवश्यक तेवढी खबरदारी घेत नसल्यामुळे कदाचित संक्रमित रुग्णसंख्येत घट होताना दिसत नसल्याचे चिन्ह समोर आले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
कोरोना रुग्णांची वाढती संख्या, अपुरे पडणारे बेड, वैद्यकीय सुविधा, ऑक्सिजन ची अपुरी सुविधा यामुळे अनेक रुग्ण घरामध्येच राहून उपचार पद्धती अवलंबण्याचा पर्याय निवडतात. कोरोनाची सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांसाठी डॉक्टर स्वत: होम क़्वारंटाइनचा पर्याय सुचवतात. कारण काही वेळा रुग्णालयातील इतर रुग्णांची स्थिती पाहून, डोळ्यासमोर एखाद्याचा ओढवलेला मृत्यु पाहिल्यावर मनुष्य घाबरून जातो आणि भीतीमुळे सौम्य लक्षण असलेला रुग्ण सुद्धा दगावण्याची भीती निर्माण होऊ शकते. हे सर्व टाळण्यासाठी होम क़्वारंटाइन हा पर्याय उपयुक्त ठरू शकतो.परंतु, हा पर्याय बंद केल्याने जनतेमध्ये काहीशा प्रमाणात नाराजी पसरली आहे.
राज्यातील काही जिल्ह्यामध्ये ज्यांना कोरोनाची सौम्य लक्षणे आहेत त्यांनी गृह विलगीकरण बंद करून संस्थात्मक विलगीकरणामध्ये उपचारासाठी दाखल होण्याचे आवाहन राजेश टोपे यांनी केले आहे. तसेच मोठ्या शहरांमध्ये कोरोनाचा सरासरी दर कमी येत असून ग्रामीण भागामध्ये मात्र हा दर चढतच चाललेला दिसत आहे. त्यामुळे कोरोना संसर्गाची ही साखळी तोडण्यासाठी सरकारने हा गृह विलगीकरणाचा पर्याय बंद करून जास्तीत जास्त संस्थात्मक विलगीकरणाचा पर्याय स्वीकारण्याचा निर्णय घेतला असून जनतेने त्याला सहकार्य करण्याची विनंती केली आहे.