नाताळ सुट्टीच्या कालावधीत परजिल्ह्यातील लाखो पर्यटक प्रसिद्ध गणपतीपुळे पर्यटनस्थळी दाखल झाले आहेत. त्यामुळे गणपतीपुळेत मोठ्याप्रमाणात गर्दी झाली आहे. बहुसंख्य पर्यटक खासगी गाड्या घेऊन येत असल्यामुळे वाहतूक कोंडी होते. अरूंद रस्त्यांमुळे वाहने हाकताना अडचणी होतात. हॉटेल वेस्ट बे ते आपटा तिठा आपटा तिठा ते हॉटेल कृष्णा सीव्ह्यू परिसरात चार चाकीसह मोठ्या गाड्यांची रांगा लागतात. ही परिस्थिती पोलिसांनी कौशल्याने आणि सयमांने हाताळल्यामुळे पर्यटकांकडून समाधान व्यक्त होत आहे.
सागरी जयगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गणपतीपुळे पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक क्रांती पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप साळवी यांच्यासह पोलीस अमंलदार नीलेश गुरव, कुणाल चव्हाण, राहुल घोरपडे, जयेश कीर, होमगार्ड अमेय शिवगण, मनोज घाणेकर, श्री. घाणेकर आदींनी कौशल्याने झालेल्या वाहतूक कोंडीवर उपाययोजना करत वाहतूक सुरळीत ठेवली. पोलिस निरीक्षक पाटील यांनी स्वतः आपटा तिठा येथे थांबून वाहतूक नियंत्रणासाठी नियोजन केले.
सोमवारी दुपारी अचानक वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे अनेक पर्यटकांना निवासाच्या ठिकाणी पोचता आले नाही. याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात होती. याची गंभीर दखल घेत प्रशासनाने तत्काळ नियोजन केले. शनिवार, रविवार, सोमवार अशा सलग सुट्टया आल्यामुळे पर्यटकांची गर्दी होती. दोन दिवस लॉजही फुल्ल होते. काही पर्यटक मालगुंड, निवेंडी भगवतीनगर येथे घरगुती लॉजमध्ये राहण्यास आले होते. रात्री उशिरापर्यंत येथील खानावळीत हॉटेल्समध्ये जेवणासाठी गर्दी होती. त्यामुळे येथील व्यावसायिकांमध्ये समाधान होते. गणपतीपुळे मंदिरातही श्रींच्या दर्शनासाठी भक्तांच्या रांगा लागल्या आहेत.
सकाळपासूनच हौशी पर्यटक समुद्रस्नानासाठी किनाऱ्यावर गर्दी करत होते. चौपाटीवर स्नान करताना कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी ग्रामपंचायत गणपतीपुळे यांचे जीवरक्षक, संस्थांचे सुरक्षारक्षक तसेच पोलीस हे दिवसभर उन्हामध्ये समुद्र पाटीवर पेट्रोलिंग करत होते. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी गणपतीपुळे येथील पोलिसांच्या मदतीला रत्नागिरीतील वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी, मुख्यालय येथून आले होते.